सिद्धार्थ चांदेकर हा मराठी कलाविश्वातील आघाडीचा अभिनेता म्हणून ओळखला जातो. काही दिवसांपूर्वी सिद्धार्थ त्याच्या वैयक्तिक आयुष्यामुळे चर्चेत आला होता. अभिनेत्याने स्वत: पुढाकार घेऊन त्याच्या आईच्या दुसऱ्या लग्नाला पाठिंबा दिल्याने मराठी कलाविश्वात त्याचं कौतुक करण्यात आलं. याबाबत आता सिद्धार्थची आई सीमा चांदेकर यांनी प्रतिक्रिया दिली आहे. हा धाडसी निर्णय घेण्यामागे नेमकं काय कारण होतं या सगळ्या प्रवासात त्यांना लेकाने कशी साथ दिली याबद्दल सीमा चांदेकर यांनी राजश्री मराठीला दिलेल्या मुलाखतीत खुलासा केला आहे.
सीमा चांदेकर म्हणाल्या, “मी अनेक वर्ष एकटी आहे. माझ्या मुलांना मी एकटीने सांभाळंल पण, तेव्हा काही वाटायचं नाही कारण सुमेधा आणि सिद्धार्थ माझ्या बरोबरीने उभे होते. आम्ही तिघेही एकमेकांचा खूप मोठा आधार होतो. त्यानंतर सुमेधाचं वेगळं आयुष्य आणि सिद्धार्थ गेल्या काही वर्षात त्याच्या कामात खूपच व्यग्र झाला. त्यात दोन वर्षांपूर्वी माझा एक अपघात झाला. या सगळ्यात मला एकटेपणा जाणवू लागला.”
हेही वाचा : Who Is Your Gynac : मासिक पाळी, सेक्स लाइफ ते बाळंतपण; महिलांच्या समस्यांवर भाष्य करणारी सीरिज
सीमा चांदेकर पुढे म्हणाल्या, “मी सिद्धार्थला सारखा फोन करायचे…पण, तो खरंच कामामध्ये खूप व्यग्र असायचा. त्याचं माझ्यावर खूप प्रेम आहे. वेळात वेळ काढून तो मला सेटवरुन फोन करायचा. एक दिवस सहज मला सिद्धार्थ म्हणाला, आई मला एक स्वप्न पडलेलं त्यात तुझं लग्न होतंय…तू खरंच याबद्दल विचार का करत नाहीस? काय हरकत आहे? त्याचं ऐकल्यावर मी या सगळ्या गोष्टींवर खूप बारकाईने विचार केला. लोकं काय म्हणतील असाही विचार माझ्या डोक्यात होताच पण, सिद्धार्थने मला खूप धीर दिला. या सगळ्या गोष्टी मी मितालीशी सुद्धा बोलले ती मला म्हणाली, काकू आता फक्त तू तुझा विचार कर…तुझ्याबरोबर आम्ही कायम आहोत.”
हेही वाचा : “जेव्हा पुरुष गरोदर…” स्त्री-पुरुष समानतेबद्दल अन् ‘फेमीनिजम’बद्दल नीना गुप्तांनी केलं परखड भाष्य
“सिद्धार्थ-मिताली आणि सुमेधाशी बोलून मी या सगळ्या गोष्टींवर विचार केला. रितसर विवाह संस्थेत नाव नोंदणी केली. त्यानंतर नितीन म्हसवडे यांच्याशी माझी भेट झाली. ते अकाऊंट्समध्ये काम करतात. अतिशय साधा, सरळ आणि स्वच्छ माणूस…माझं सगळं काही ऐकतात. आता त्यांच्या आई सुद्धा आमच्याबरोबर राहतात. ते दोघंही मला खूप सांभाळून घेतात. आता मला छान वाटतंय. या सगळ्या प्रवासात माझी मुलं कायम माझ्याबरोबर होती.” अशी प्रतिक्रिया सीमा चांदेकर यांनी दिली आहे. दरम्यान, सिद्धार्थने त्याच्या आईबरोबर ‘जिवलगा’ या छोट्या पडद्यावरील मालिकेत एकत्र काम केलं होतं.