चित्रपट, मालिका असो किंवा वेब सीरिज सिद्धार्थ चांदेकरच्या अभिनयाची झलक प्रेक्षकांनी प्रत्येक माध्यमांत पाहिलेली आहे. गेल्या काही महिन्यांमध्ये त्याचे लागोपाठ अनेक चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला आले. सिद्धार्थला लहानपणापासूनच अभिनयाची आवड आहे. या क्षेत्रात करिअर करण्यासाठी त्याला त्याच्या आईने अगदी सुरुवातीपासून खंबीरपणे पाठिंबा दिला होता. एवढंच नव्हे तर या मायलेकांनी मिळून एका मालिकेत एकत्र सुद्धा काम केलेलं आहे.
सिद्धार्थचा चाहता वर्ग मोठ्या प्रमाणात आहे. अलीकडची तरुणपिढी त्याला सोशल मीडियावर फॉलो करते. इन्स्टाग्रामवर त्याने त्याचं संपूर्ण नाव सिद्धार्थ सीमा चांदेकर असं लिहिलं आहे. त्यामुळे अभिनेता त्याच्या आईचं नाव का लावतो? असा प्रश्न त्याला अनेकदा विचारला जातो. नुकत्याच लोकमत फिल्मीला दिलेल्या मुलाखतीत सिद्धार्थ चांदेकरने बालपण, कौटुंबिक पार्श्वभूमी व त्याच्या वडिलांबद्दल भाष्य केलं आहे. यावेळी त्याने आईचं नाव का लावतो याबाबत देखील खुलासा केला आहे.
हेही वाचा : “अतोनात पैशांच्या जोरावर…”, निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मराठी दिग्दर्शकाची पोस्ट चर्चेत; म्हणाले…
सिद्धार्थ म्हणाला, “माझी आई एकटीच आहे माझ्यासाठी…आईच माझे वडील आहेत आणि तिच माझ्यासाठी आई सुद्धा आहे. कधी ती माझी बहीण, तर कधी माझी मैत्रीण असते. आता माझ्यासाठी सगळंच माझी आई आहे. मग मधलं नाव सुद्धा तिच असलं पाहिजे.”
“ज्याने आपल्याला घडवलं त्याचं मधलं नाव लावायचं अशी जर समजूत असेल तर, मला वाटतं जिने मला घडवलंय तिचं नाव मी लावायला पाहिजे. ती म्हणजे माझी आई. कागदपत्रांवर आईचं नाव का लावलं जात नाही? हा प्रश्न मला खूपदा पडतो त्यामुळे जिथे शक्य आहे तिथे मी नाव बदलून टाकलं आहे.” असं सिद्धार्थ चांदेकरने सांगितलं.
दरम्यान, सिद्धार्थ चांदेकरच्या कामाविषयी सांगायचं झालं, तर गेल्या काही महिन्यांमध्ये त्याचे ‘झिम्मा २’, ‘ओले आले’, ‘श्रीदेवी प्रसन्न’ असे बरेच चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला आले. या सगळ्या चित्रपटांमध्ये त्याने साकारलेल्या भूमिकांचं भरभरून कौतुक करण्यात आलं.