बहुचर्चित मराठी चित्रपट ‘झिम्मा २’ लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. गेल्या अनेक दिवसांपासून या चित्रपटाची चर्चा सुरु आहे. काही दिवसांपूर्वीच या चित्रपटाचा टीझर प्रदर्शित करण्यात आला. या टीझरला प्रेक्षकांकडून चांगला प्रतिसाद मिळाला होता. आता या चित्रपटातील पहिलं गाणं प्रदर्शित होणार आहे. नुकतंच या गाण्याचा प्रोमो प्रदर्शित करण्यात आला आहे.
हेही वाचा- “माझी गर्लफ्रेंड नाराज झाली आहे…”, उमेश कामतकडे चाहत्याने मांडली व्यथा, अभिनेता म्हणाला, “याला मी…”
अभिनेता सिद्धार्थ चांदेकरने आपल्या इन्स्टाग्रामवर या गाण्याचा प्रोमो शेअर केला आहे. मराठी पोरी दुनियेला दाखवतील माज असं या गाण्याचे बोल आहेत. सिद्धार्थने हा प्रोमो शेअर करत लिहिलं मराठी साज, मराठी माज! मराठी पोरींचं अस्सल सेलीब्रेशन…आपल्या ‘झिम्मा २’ मधलं पहिलं गाणं येतंय लवकरच!” गाण्याच्या या झलकनंतर प्रेक्षकांमध्ये गाण्याबाबतची उत्सुक्ता वाढली आहे.
‘झिम्मा २’ २४ नोव्हेंबरला चित्रपटगृहात प्रदर्शित होणार आहे. या चित्रपटात सुहास जोशी, निर्मिती सावंत, सुचित्रा बांदेकर, क्षिती जोग, सायली संजीव, रिंकू राजगुरु, शिवानी सुर्वे आणि सिद्धार्थ चांदेकर यांच्या प्रमुख भूमिका आहेत. आनंद एल. राय आणि क्षिती जोग यांनी चित्रपटाची निर्मीती केली असून हेमंत ढोमेने या चित्रपटाचे दिग्दर्शन केलं आहे.
या चित्रपटाचा पहिला भाग ‘झिम्मा’ २०२१ मध्ये प्रदर्शित झाला होता. बॉक्स ऑफिसवर या चित्रपटाने जबरदस्त कमाई केली होती. आता ‘झिम्मा २’ची प्रेक्षक आतुरतेने वाट पाहत आहेत. चित्रपटाच्या नावाची लोकप्रियता पाहता बॉक्स ऑफिसवर हा चित्रपट चांगली कमाई करेल असा अंदाज व्यक्त करण्यात येत आहे.