गेल्या काही वर्षांमध्ये मराठीत अनेक हटके चित्रपटांची निर्मिती झाली आहे. काही महिन्यांपूर्वीच प्रदर्शित झालेल्या ‘बाईपण भारी देवा’ चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर जबरदस्त कमाई केली होती. आता नुकताच प्रदर्शित झालेल्या ‘झिम्मा २’ चित्रपटाला प्रेक्षकांचा भरघोस प्रतिसाद मिळताना दिसत आहे. ‘झिम्मा २’मध्ये सिद्धार्थ चांदेकरने मुख्य भूमिका साकारली होती. आता लवकरच सिद्धार्थचा आणखी एक नवा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. या चित्रपटात सिद्धार्थबरोबर नाना पाटेकर यांची प्रमुख भूमिका आहे.
सिद्धार्थने इन्स्टाग्राम अकाउंटवर आपल्या अगामी चित्रपटाबाबत एक पोस्ट शेअर केली आहे. या पोस्टमध्ये त्याने ‘ओले आले’ चित्रपटातील नाना पाटेकरांबरोबरचा एक फोटो शेअर केला आहे. हा फोटो शेअर करत सिद्धार्थने लिहिलं, ‘आता बाप-मुलाच्या रोड ट्रीपचे काय? ओले आले! ५ जानेवारीपासून! जगुया झगामगा..!’ या पोस्टवरून ‘ओले आले’ चित्रपटात नाना पाटेकर सिद्धार्थ चांदेकरच्या वडिलांची भूमिका साकारणार असल्याचे स्पष्ट झाले आहे.
काही दिवसांपूर्वीच या चित्रपटाचे पहिले पोस्टर प्रदर्शित झाले होते. या पोस्टरमध्ये सिद्धार्थ चांदेकर, नाना पाटेकर व सायली संजीव रिव्हर राफ्टिंगचा आनंद घेताना दिसून आले होते. या पोस्टबरोबर ‘एक अशा प्रवासाची गोष्ट, ज्याने शिकवले जीवन जगण्याचे सूत्र!’ असे कॅप्शनही दिलं आहे. या फोटोवरून हे त्रिकुट कुठे चालले आहे? या प्रवासाचं नेमकं प्रयोजन काय बरं असेल? असे बरेच प्रश्न निर्माण झाले आहेत.
‘ओले आले’ चित्रपटाचे दिग्दर्शन विपुल मेहता यांनी केले आहे. या चित्रपटाला बॉलीवूडमधील सुप्रसिद्ध संगीतकार जोडी सचिन-जिगर यांचे संगीत लाभले आहे. ‘ओले आले’ या चित्रपटाच्या माध्यमातून सचिन व जिगर यांनी मराठी संगीत क्षेत्रात पदार्पण केलं आहे. या चित्रपटात नाना पाटेकर, सिद्धार्थ चांदेकर बरोबर सायली संजीवची प्रमुख भूमिका आहे. या चित्रपटात मकरंद अनासपुरे हेदेखील महत्त्वाची भूमिका साकारणार आहेत. ५ जानेवारीला हा चित्रपट सर्वत्र प्रदर्शित होणार आहे.