सिद्धार्थ चांदेकर हा मराठी सिनेसृष्टीतील लोकप्रिय अभिनेता म्हणून ओळखला जातो. सिद्धार्थ सोशल मीडियावर प्रचंड सक्रिय असतो. आपल्या आयुष्यातील प्रत्येक गोष्टीची माहिती तो इन्स्टाग्रामवर शेअर करत चाहत्यांचे मनोरंजन करतो. सध्या अभिनेत्याने शेअर केलेल्या अशाच एका व्हिडीओने सर्वांचे लक्ष वेधून घेतले आहे. या व्हिडीओमध्ये सिद्धार्थ चांदेकर आपल्या फिटनेसवर लक्ष केंद्रित करून व्यायाम करताना दिसत आहे.
सिद्धार्थने या सोशल मीडियावर पोस्टद्वारे निरोगी राहण्यासाठी व्यायाम किती महत्त्वाचा आहे हे सांगितले आहे. याचबरोबर त्याने स्वत:चे वाढलेले वजन कसे कमी केले याबद्दल त्याच्या चाहत्यांना माहिती दिली आहे. सिद्धार्थ या पोस्टमध्ये लिहितो, “माझ्या वजन कमी करण्याच्या प्रवासाला जानेवारी महिन्यात सुरुवात झाली. मला सुरुवातीचे काही दिवस अत्यंत कठीण गेले.”
हेही वाचा : Video: “चार-पाच किलोची तलवार आणि ढाल घेऊन मावळे…”, संतोष जुवेकरची पोस्ट चर्चेत, म्हणाला, “विचार केला तरी…”
“जानेवारी महिन्यात मला माझ्या शरीराविषयी अजिबात आदर वाटत नव्हता. मला माझ्या फिटनेस ट्रेनरने या नकारात्मक विचारातून बाहेर काढले. १०३ किलोवरून मी जवळपास १६ किलो वजन कमी करत आता ८७ किलोपर्यंत आणले आहे. एक चांगला माणूस होण्यासाठी, चांगले आयुष्य जगण्यासाठी शिस्त आणि प्रामाणिकपणा अतिशय आवश्यक आहे. मला माहिती आहे मी अजूनही व्यायामात परिपूर्ण झालेलो नाही कारण, माझा प्रवास संपलेला नसून तो नुकताच सुरु झाला आहे.” असे सिद्धार्थने त्याच्या इन्स्टाग्राम पोस्टमध्ये म्हटले आहे.
दरम्यान, सिद्धार्थ चांदेकरने शेअर केलेल्या या पोस्टवर अनेकांनी कमेंट करत त्याचे कौतुक केले आहे. अभिनेता लवकरच ‘झिम्मा २’ चित्रपटातून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. चित्रपटाच्या पहिल्या भागात सिद्धार्थसह सुहास जोशी, निर्मिती सावंत, सुचित्रा बांदेकर, सोनाली कुलकर्णी, सायली संजीव, क्षिती जोग, मृण्मयी गोडबोले, हेमंत ढोमे, अनंत जोग, चैत्राली गुप्ते या कलाकारांनी महत्वपूर्ण भूमिका साकारल्या होत्या.