सिद्धार्थ चांदेकर(Siddharth Chandekar) व मिताली मयेकर(Mitali Mayekar) हे मराठी चित्रपटसृष्टीतील लाडके जोडपे आहे. नुकतेच ते फसक्लास दाभाडे या चित्रपटातून प्रेक्षकांच्या भेटीला आले होते. हेमंत ढोमे दिग्दर्शित फसक्लास दाभाडे या चित्रपटात सिद्धार्थ चांदेकर, अमेय वाघ व क्षिती जोग हे कलाकार प्रमुख भूमिकेत दिसले आहेत. त्यांनी भावंडांची भूमिका साकारली आहे. बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घातल्यानंतर आता या चित्रपटाला ओटीटीवरही प्रेक्षकांचा उत्तम प्रतिसाद मिळताना दिसत आहे. विशेष बाब म्हणजे या चित्रपटाच्या निमित्ताने सिद्धार्थ व मितालीने पहिल्यांदाच एकत्र काम केले आहे. आता सिद्धार्थ चांदेकरने सोशल मीडियावर पत्नी मितालीचा एक व्हिडीओ शेअर केला आहे. या व्हिडीओवर मितालीने केलेली कमेंट चाहत्यांचे लक्ष वेधून घेताना दिसत आहे.
माझ्याबरोबर माझी पत्नी व एक…
सिद्धार्थ चांदेकर व मिताली मयेकर अभिनयाबरोबरच त्यांच्या सोशल मीडियावरील फोटो व व्हिडीओंमुळेदेखील सातत्याने चर्चेत असतात. सध्या ते परदेशात फिरण्यासाठी गेले आहेत. यादरम्यान, सिद्धार्थ चांदेकरने सोशल मीडियावर मिताली मयेकरचा एक व्हिडीओ शेअर केला आहे, ज्यामध्ये तिच्या दोन बाजू दिसत आहेत. एकीकडे ती घरी जायचं आहे असं म्हणत आहे, तर दुसरीकडे ती मजा मस्ती करताना दिसत आहे. एकीकडे ती सुट्ट्यांचा आनंद घेत असल्याचे व्हिडीओ पाहायला मिळत आहे, तर दुसरीकडे ती त्रासलेलीदेखील दिसत आहे. हा व्हिडीओ शेअर करताना सिद्धार्थ चांदेकरने मितालीच्या या दुहेरी रूपाला उद्देशून लिहिले, “या संपूर्ण ट्रिपमध्ये माझ्याबरोबर माझी पत्नी व एक अनोळखी मुलगी होती.”
सिद्धार्थने शेअर केलेल्या या व्हिडीओवर मितालीने कमेंट करत लिहिले, “मी विचार करत होते की तुला आतापर्यंत याची सवय झाली असेल. ही ट्रीप विसर. आपल्या लग्नाची चार वर्षही अशीच दिसतात”, असे लिहित मितालीने हसण्याच्या इमोजी शेअर केल्या आहेत. मितालीसह अनेकांनी यावर कमेंट केल्या आहेत. अनेकांनी हसण्याच्या इमोजी शेअर केल्या आहेत. महाराष्ट्राची हास्यजत्रा फेम अभिनेत्री प्रियदर्शिनी इंदलकरनेदेखील हसण्याच्या इमोजी शेअर केल्या आहेत.
दरम्यान, फसक्लास दाभाडे या चित्रपटाच्या प्रमोशनदरम्यान दिलेल्या मुलाखतीत सिद्धार्थ व मितालीने त्यांच्या लग्नातील किस्से सांगितले होते. त्यांच्या लग्नादिवशीच त्यांचे मोठे भांडण झाले होते, असाही खुलासा त्यांनी केला होता. सिद्धार्थ चांदेकर व मिताली मयेकर यांनी २०२१ मध्ये लग्नगाठ बांधली आहे. आता हे कलाकार कोणता चित्रपट किंवा मालिकेतून प्रेक्षकांच्या भेटीला येणार हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.