Marathi Actor Siddharth Chandekar : अभिनेता सिद्धार्थ चांदेकर सध्या त्याच्या ‘फसक्लास दाभाडे’ चित्रपटामुळे चर्चेत आहे. या चित्रपटात त्याच्यासह पहिल्यांदाच त्याची पत्नी अभिनेत्री मिताली मयेकर स्क्रीन शेअर करणार आहे. सिद्धार्थ-मिताली यांची जोडी प्रेक्षकांमध्ये प्रचंड लोकप्रिय आहे. या जोडप्याचा चाहतावर्ग मोठ्या प्रमाणात आहे. मराठी कलाविश्वातील आदर्श जोडी म्हणून यांच्याकडे पाहिलं जातं. सिद्धार्थ-मितालीचे चाहते हे दोघं चित्रपटात एकत्र केव्हा झळकणार याची आतुरतेने वाट पाहत होते. अखेर या नव्या वर्षात दोघांनीही त्यांच्या पहिल्या चित्रपटाची घोषणा केली आहे.
सिद्धार्थ चांदेकर आणि मिताली मयेकर हेमंत ढोमे दिग्दर्शित ‘फसक्लास दाभाडे’ चित्रपटात एकत्र स्क्रीन शेअर करणार आहेत. या चित्रपटातलं लग्नाच्या आठवणींना उजाळा देणारं ‘दिस सरले’ हे गाणं सोशल मीडियावर नुकतंच प्रदर्शित करण्यात आलं. या गाण्यात प्रेक्षकांना मितालीची झलक पाहायला मिळाली. सिद्धार्थ-मितालीने हे गाणं शेअर करत याला, “आमचा पहिला सिनेमा एकत्र” असं कॅप्शन दिलं होतं.
सिद्धार्थ चांदेकरची खास पोस्ट
आता सिद्धार्थने ( Siddharth Chandekar ) केलेली आणखी एक पोस्ट चर्चेत आली आहे. ‘फसक्लास दाभाडे’ चित्रपट येत्या २४ जानेवारीला प्रदर्शित होतोय. हा दोघांचा पहिला सिनेमा आहे. तर, २०२१ मध्ये २४ जानेवारीलाच सिद्धार्थ-मितालीचा लग्नसोहळा पार पडला होता. इतकंच नव्हे तर, सिद्धार्थ-मितालीचा साखरपुडा २४ जानेवारी २०१९ रोजी संपन्न झाला होता. त्यामुळे, अभिनेत्याच्या आयुष्यात या तारखेशी खास कनेक्शन आहे.
सिद्धार्थ लग्नातील सुंदर व्हिडीओ शेअर करत लिहितो, “२४ जानेवारी २०२१ – लग्न, २४ जानेवारी २०२५ – पहिला सिनेमा एकत्र, फसक्लास होणार सगळं!” यावर एका नेटकऱ्याने, “तुमचा साखरपुडा सुद्धा २४ जानेवारीलाच झाला होता ना?” असा प्रश्न सिद्धार्थला विचारला. यावर त्याने ‘२४ जानेवारी २०१९’ असं उत्तर दिलं आहे. यामुळेच या तारखेचं सिद्धार्थ-मितालीच्या आयुष्यात खास महत्त्व असल्याचं स्पष्ट होत आहे.
हेही वाचा : गोविंदा व त्याची पत्नी राहतात वेगळे, सुनीता आहुजा पतीबद्दल म्हणाली, “त्याच्याकडे अफेअर्ससाठी वेळ…”
दरम्यान, ‘फसक्लास दाभाडे’ या हेमंत ढोमे दिग्दर्शित चित्रपटात क्षिती जोग, सिद्धार्थ चांदेकर, अमेय वाघ, निवेदिता सराफ, हरिश दुधाडे, राजन भिसे, आणि राजसी भावे यांच्या प्रमुख भूमिका आहेत. हा चित्रपट येत्या २४ जानेवारीला सर्वत्र प्रदर्शित होणार आहे.