सिद्धार्थ चांदेकर व मिताली मयेकर मराठी मनोरंजनसृष्टीतील लोकप्रिय जोडी आहे. सोशल मीडियावर दोघेही मोठ्या प्रमाणात सक्रिय असतात. निरनिराळे फोटो व व्हिडीओ शेअर करीत ते चाहत्यांना अपडेट देत असतात. अनेक वर्षे एकमेकांना डेट केल्यानंतर सिद्धार्थ व मितालीने २०२१ साली लग्न केले. दरम्यान, एका मुलाखतीत सिद्धार्थने मितालीबरोबरच्या पहिल्या भेटीचा किस्सा सांगितला आहे.
सिद्धार्थने नुकतीच ’लोकमत फिल्मी’ला मुलाखत दिली. या मुलाखतीत त्याने त्याची व मितालीची लव्ह स्टोरी कशी सुरू झाली याबाबतचा खुलासा केला आहे. सिद्धार्थ म्हणाला, “मिताली आणि मी जेव्हा भेटलो तेव्हा आम्ही अजिबात डेट करण्यासाठी भेटलो नाही. आम्ही फक्त टाइमपाससाठी भेटलो. नंतर आम्ही जेव्हा भेटत गेलो तेव्हा मी मितालीला सोडून दुसऱ्या कोणत्याच मुलीला भेटायचो नाही. मला सतत मितालीबरोबर वेळ घालवायचा आहे, असं वाटू लागलं. मला जाणवलं की, ही मुलगी माझ्या आयुष्यात हवी.”
सिद्धार्थ पुढे म्हणाला, “आम्ही जेव्हा पहिल्यांदा भेटलो तेव्हा आम्ही दोघेही वेगवेगळ्या रिलेशनशिपमध्ये होते. पहिल्या भेटीत आम्ही लंडनला जाण्याबद्दल बोललो होतो आणि मी नुकताच लंडनला जाऊन आलो होतो. त्यानंतर जेव्हा आम्ही पुन्हा भेटलो तेव्हा मी आमचं मागचं बोलण आठवलं तेव्हा जाणवलं की, तेव्हाही आम्ही एकमेकांना आवडत होतो. आम्ही फक्त ते एकमेकांना सांगत नव्हतो.”
हेही वाचा- सई ताम्हणकरला हवा आहे ‘असा’ जोडीदार; अपेक्षा सांगत म्हणाली, “ज्याच्याबरोबर वयाची ६० वर्षे…”
सिद्धार्थच्या कामाबद्दल बोलायचे झाले, तर आतापर्यंत त्याने अनेक सुपरहिट मराठी चित्रपटांमध्ये काम केले आहे. काही दिवसांपूर्वीच त्याचे ’झिम्मा २’ व ’ओले आले’ हे चित्रपट प्रदर्शित झाले. बॉक्स ऑफिसवर या दोन्ही चित्रपटांनी चांगलीच कमाई केली. आता येत्या २ फेब्रुवारीला त्याचा ‘श्रीदेवी प्रसन्न’ चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या चित्रपटात त्याच्याबरोबर अभिनेत्री सई ताम्हणकरची प्रमुख भूमिका आहे. या चित्रपटातून प्रेक्षकांना सई व सिद्धार्थची अरेंजवाली लव्ह स्टोरी बघायला मिळणार आहे.