मालिका, चित्रपट, नाटक अशा तिन्ही माध्यमांमध्ये आपल्या अभिनयाचा ठसा उमटवणारा अभिनेता म्हणजेच सिद्धार्थ चांदेकर. ‘क्लासमेट’, ‘झिम्मा’, ‘झेंडा’ अशा अनेक चित्रपटांमुळे तो घराघरांत लोकप्रिय झाला. आजच्या घडीला त्याचा चाहतावर्ग मोठ्या प्रमाणात आहे. सिद्धार्थने नुकतीच कॉकटेल स्टुडिओला मुलाखत दिली. यावेळी त्याने पुरस्कार सोहळ्यांविषयी आपलं स्पष्ट मत मांडलं.
अभिनेत्याला “अवॉर्ड्स विकले जातात का?” असा प्रश्न विचारण्यात आला. यावर सिद्धार्थ सांगतो, “आपल्याकडे तरी मला नाही वाटत की, पुरस्कार विकले जात असतील. आपण त्या लेव्हलला अजूनतरी नाही पोहोचलोय आणि माझी इच्छा आहे की ती वेळ कधीच येऊ नये. मला या गोष्टी पटत नाही. मला सत्य परिस्थिती माहिती नाही. पण, अवार्ड्स निश्चितपणे विकले जात नाही.”
हेही वाचा : “पप्पा, तुम्ही एवढी वर्षे…”, वडिलांच्या वाढदिवशी शिवानी रांगोळेची खास पोस्ट; मास्तरीणबाई म्हणाल्या…
“अवार्ड्स विकले जात नाहीत पण, पक्षपात केला जातो हे मला नक्की माहिती आहे. जर, तुम्ही संबंधित सोहळ्यात फेव्हरेट असाल तर तुम्ही काय काम केलंय हे पाहिलं जात नाही. अलीकडच्या काळात पुरस्कार सोहळ्याचं स्वरुप काही अंशी हुकलेलं आहे आणि ही गोष्ट आता प्रेक्षकांसह कलाकारांना सुद्धा माहिती आहे. याआधी जे अवॉर्ड फंक्शन व्हायचे…ते कार्यक्रम खूपच भारी असायचे. टीव्हीसमोर बसून असे सोहळे आपण स्वत: पाहायचो किंवा नॉमिनेशन जाहीर झाल्यावर आपल्या मनात उत्सुकता निर्माण व्हायची. पण, आता ती उत्सुकता नाहीशी झालीये. प्रेक्षकांना माहिती असतं की हा फेवरेट आहे म्हणजे त्याला/तिला पुरस्कार देणार. पुरस्कार सोहळ्यांमधला सरप्राईज एलिमेंट आता गेलाय” असं सिद्धार्थ चांदेकरने सांगितलं.
“पक्षपातीपणा कोणामुळे होतो?” यावर सांगताना सिद्धार्थ म्हणाला, “पक्षपात हा एका माणसापासून सुरू होतो. जसं की समजा…जर संबंधित लोकांचा तू फेव्हरेट असशील तर, त्यांनी नियोजन केलेल्या सगळ्या कार्यक्रमांचा, त्या प्रेक्षकांचा तू फेव्हरेट राहणार. त्यामुळे पक्षपात होण्याची अनेक कारणं आहेत. मला माहितीये की एकेकाळी मी सुद्धा फेव्हरेट होऊन गेलोय. जेव्हा मी फेव्हरेट होतो तेव्हा माझी काम एवढ्या मोठ्या प्रमाणात लोकांसमोर पोहोचली नाहीत आणि जेव्हा मी इतर लोकांचा फेव्हरेट नव्हतो तेव्हा माझी चांगली काम बाहेर आली.”
सिद्दार्थ पुढे म्हणाला, “अगदी परीक्षक सुद्धा ते कोणाचे तरी आवडते आहेत म्हणून निवडले जातात. हे सगळे मुद्दे आपण लक्षात ठेवले पाहिजेत. व्होट करून विजेता सिलेक्ट करणं यावर माझा अजिबात विश्वास नाही. याउलट जर एक मोठं पॅनेल असेल जिथे सगळ्या क्षेत्रातील लोकांनी चर्चा करून त्यानंतर हे सोहळे किंवा पुरस्कार दिले पाहिजेत.”