मराठी चित्रपटसृष्टीतील लोकप्रिय अभिनेत्यांपैकी एक म्हणजे सिद्धार्थ चांदेकर. सिद्धार्थला चॉकलेट हीरो म्हणूनही ओळखले जाते. सिद्धार्थने अभिनयाच्या जोरावर प्रेक्षकांच्या मनात वेगळे स्थान निर्माण केले आहे. चित्रपट, मालिका, वेब सीरिज अशा तिन्ही माध्यमांमध्ये सिद्धार्थ चांदेकरने त्याच्या अभिनयाचा ठसा उमटवला. पण, सिद्धार्थला अभिनेता बनण्याअगोदर एका वेगळ्याच क्षेत्रात करिअर करायचे होते. एका मुलाखतीत त्याने याबाबतचा खुलासा केला आहे.
अलीकडेच सिद्धार्थने ‘राजसी मराठी’ला मुलाखत दिली. या मुलाखतीत त्याने त्याच्या करिअरबरोबर वैयक्तिक आयुष्याबाबतही अनेक खुलासे केले आहेत. दरम्यान, सिद्धार्थने अभिनय क्षेत्रात येण्यापूर्वी कशात करिअर करायचे होते याबाबतचा खुलासा केला आहे. तो म्हणाला, “फार कमी लोकांना माहीत आहे की, आमची मेस होती. आमच्या घरात दुपारी व रात्री जवळपास ४० लोक जेवायला यायचे. आमची कॅटरिंग सर्व्हिससुद्धा होती. मी, माझी आई, माझी ताई एवढेच नाही, तर माझे वडीलही शूटिंगच्या सेटवर जेवण द्यायला जायचे.”
सिद्धार्थ पुढे म्हणाला, “त्यामुळेच मला शेफ बनण्याची भयंकर इच्छा झाली होती. अभिनेता बनण्याअगोदरही मला वाटलं होती की, आपण शेफ बनलं पाहिजे. कारण- मी आईला व माझ्या बहिणीला भाजी चिरताना, कणीक भिजविताना, लोकांना वाढताना बघितलेलं आहे. त्यामुळेच मला शेफ बनायचं होतं. “
सिद्धार्थच्या कामाबद्दल बोलायचे झाले, तर आतापर्यंत त्याने अनेक सुपरहिट मराठी चित्रपटांमध्ये काम केले आहे. काही दिवसांपूर्वीच त्याचे ’झिम्मा २’ व ’ओले आले’ हे चित्रपट प्रदर्शित झाले. बॉक्स ऑफिसवर या दोन्ही चित्रपटांनी चांगलीच कमाई केली. २ फेब्रुवारीला त्याचा ‘श्रीदेवी प्रसन्न’ चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला आला. या चित्रपटात त्याच्याबरोबर अभिनेत्री सई ताम्हणकरची प्रमुख भूमिका आहे. या चित्रपटातून प्रेक्षकांना सई व सिद्धार्थची ‘अरेंजवाली लव्ह स्टोरी’ बघायला मिळत आहे.