मराठीतील लोकप्रिय अभिनेत्यांमध्ये सिद्धार्थ जाधवचे नाव घेतले जाते. आपल्या अभिनयाच्या जोरावर सिद्धार्थने प्रेक्षकांच्या मनात वेगळे स्थान निर्माण केले आहे. आत्तापर्यंत सिद्धार्थने अनेक सुपरहिट चित्रपटांमध्ये काम केले आहे. मराठीप्रमाणे त्याने बॉलीवूडमध्ये आपल्या ठसा उमटवला आहे. आता लवकरच सिद्धार्थचा ‘लग्नकल्लोळ’ हा नवाकोरा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. नुकताच या चित्रपटाचा टीझर प्रदर्शित करण्यात आला आहे.

काही दिवसांपूर्वीच या चित्रपटाचे मोशन पोस्टर रिलीज करण्यात आले होते. तेव्हापासून या चित्रपटाची चांगलीच चर्चा रंगली होती. आता या चित्रपटाचा टीझर समोर आला आहे. सिद्धार्थने आपल्या इन्स्टाग्रामवरुन लग्नकल्लोळचा टीझर शेअर केला आहे. ही पोस्ट शेअर करत त्याने लिहिले “डोईवर पडणार अक्षता, मांडव सजला दारी. वरमाला घेऊन उभी हातात नवरी, टिझर पाहायला मात्र जमली मंडळी सारी!! !! लग्न कल्लोळ आहेराची तारीख १ मार्च २०२४” सिद्धार्थची ही पोस्ट सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल झाली आहे. अनेक चाहत्यांनी या पोस्टवर कमेंट केल्या आहेत.

या चित्रपटात सिद्धार्थबरोबर भूषण प्रधान, मयुरी जाधव यांच्या प्रमुख भूमिका आहे. टिझरमध्ये सिद्धार्थबरोबर मयुरी लग्नमंडपात दिसत आहे तर दुसऱ्या क्षणी भूषण मयुरीला लग्नाची मागणी घालताना दिसत आहे. मात्र, मयुरी नक्की कोणाबरोबर लग्न करणार आणि हा काय ‘लग्नकल्लोळ’ सुरू आहे, याचे उत्तर प्रेक्षकांना चित्रपट पाहिल्यावरच मिळणार आहे. येत्या १ मार्चला हा चित्रपट चित्रपटगृहांमध्ये प्रदर्शित होणार आहे.

हेही वाचा- “हक्काच्या घरासाठी आईने…”, प्रथमेश परबला आठवले संघर्षाचे दिवस; म्हणाला, “चाळीने मला घडवलं!”

या चित्रपटाची निर्मिती आण्णासाहेब रामचंद्र तिरमखे, मंगल आण्णासाहेब तिरमखे, डॉ. मयुर आण्णासाहेब तिरमखे यांनी केली आहे. ‘लग्न कल्लोळ’ चित्रपटाची कथा जितेंद्रकुमार परमार यांनी लिहिली आहे. तर मोहम्मद एस. बर्मावाला व डॉ. मयुर आण्णासाहेब तिरमखे यांनी या चित्रपटाचे दिग्दर्शन केले आहे.

Story img Loader