अभिनेता सिद्धार्थ जाधव आज मराठीमधील सुप्रसिद्ध अभिनेत्यांपैकी एक आहे. त्याने आजवर आपल्या अभिनयाच्या जोरावर स्वतःचं एक वेगळं विश्व तयार केलं. अगदी सामान्य कुटुंबातील हा अभिनेत्याचे आज लाखो चाहते आहेत. पण सुरुवातीपासूनच सिद्धार्थच्या घरची आर्थिक परिस्थिती तशी बेताचीच होती. नुकतंच स्टार प्रवाह वाहिनीवरील ‘आता होऊ दे धिंगाणा’ कार्यक्रमामध्ये त्याने याबाबत खुलासा केला होता. आता सिद्धार्थच्या एका पोस्टने सगळ्यांचं लक्ष वेधून घेतलं आहे.
“दादरच्या प्लाझा चित्रपटगृहाबाहेर माझे बाबा खाली पेपर टाकून त्यावर झोपायचे. त्यांना अभिमान आहे की आपल्या पोराने आज त्याच्यासमोरच असलेल्या टॉवरमध्ये घर घेतलं आहे.” असं सिद्धार्थने या कार्यक्रमामध्ये म्हटलं होतं. आता एका ब्रँडने चक्क सिद्धार्थ जाधवच्या कपड्यांचं कलेक्शन लाँच केलं. सिद्धार्थसाठी हा क्षण अभिमानास्पद होता.
पाहा व्हिडीओ
सिद्धार्थ म्हणाला, “माझं वाढदिवसाचं गिफ्ट. तसे नवीन नवीन कपडे घालायला लहानपणापासूनच मला आवडायचं. पण नवीन कपडे फक्त दिवाळी, वाढदिवस किंवा शाळेत जाताना मिळायचे. नंतर कॉलेजमध्ये गेल्यावर कधी अंधेरी स्टेशनवरून घेतलेला ५० रुपयांचा टी-शर्ट असेल तर कधी कार्यक्रमासाठी मित्राकडून मागून घातलेले कपडे असतील.”
“रुपारेल महाविद्यालयाचा जी.एस. असताना वार्षिक कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुणे महाराष्ट्राचे राज्यपाल पी.सी. अलेक्झांडर सर आले होते. तेव्हा तर मी माझा रुपारेलचा मित्र केतन कांबळेचा ब्लेजर घातला होता. काल वाढदिवसानिमित्त @claiworld ne Silver leaf च्या ब्रँडबरोबर सिद्धार्थ जाधव कलेक्शन दिवाळीनिमित्त बाजारात आणलं. खरंच याच्यापेक्षा माझ्यासारख्या सर्वसामान्य मुलाला अजून काय गिफ्ट हवं…” सिद्धार्थची ही पोस्ट पाहून आम्हाला तुझा अभिमान आहे असं त्याच्या चाहत्यांनी कमेंटच्या माध्यमातून म्हटलं आहे.