लोकप्रिय मराठी अभिनेता सिद्धार्थ जाधव आपल्या दमदार अभिनयाबरोबरच विनोदी शैलीमुळे जास्त ओळखला जातो. अभिनेत्याने मराठीसह हिंदी सिनेसृष्टीत स्वतःची स्वतंत्र ओळख निर्माण केली आहे. सध्या सिद्धार्थ ‘स्टार प्रवाह’च्या ‘आता होऊ दे धिंगाणा २’मधून प्रेक्षकांचं मनोरंजन करत आहे. आता लवकरच त्याचा ‘लग्न कल्लोळ’ चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे. नुकतंच या चित्रपटाचं नवं मोशन पोस्टर प्रदर्शित झालं असून चांगलाचं चर्चेत आलं आहे.
काही दिवसांपूर्वी ‘लग्न कल्लोळ’ चित्रपटाचं एक जबरदस्त मोशन पोस्टर आपल्या भेटीला आलं होतं. पोस्टरमध्ये भूषण प्रधान, मयुरी देशमुख आणि सिद्धार्थ जाधव पाठमोरे दिसत होते. आता त्यांच्या लूकवरील पडदा उठला असून त्यांचे चेहरे समोर आले आहेत. सिद्धार्थ जाधव आणि भूषण प्रधान दोघेही मुंडावळ्या बांधून वरमाला घेऊन सज्ज आहेत. मात्र दोघांपैकी कोण मयुरीच्या गळ्यात ही वरमाला घालणार? हे अद्याप गुपित आहे. हे गुपित १ मार्चला उलगडणार आहे.
‘लग्न कल्लोळ’ या चित्रपटाचं दुसरं मोशन पोस्टर सिद्धार्थ जाधवने सोशल मीडियावर शेअर केलं आहे. ‘लग्न कल्लोळ’ हे मोशन पोस्टर चांगलं व्हायरल झालं असून नेटकऱ्यांचा त्यावर चांगला प्रतिसाद पाहायला मिळत आहे. “खूप छान…चांगले, दर्जेदार मराठी चित्रपट येत राहो…आणि मराठी प्रेक्षकांचा त्याला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळो…”, “खुप छान, चांगले चित्रपट आणताय भावी वाटचालीस हार्दिक शुभेच्छा”, “जबरदस्त भाऊ…बहुप्रतीक्षित…”, अशा प्रतिक्रिया सिद्धार्थने शेअर केलेल्या मोशन पोस्टवर नेटकऱ्यांनी दिल्या आहेत.
मयुर तिरमखे फिल्म्स निर्मित या चित्रपटाचे आण्णासाहेब रामचंद्र तिरमखे, मंगल आण्णासाहेब तिरमखे, डॉ. मयुर आण्णासाहेब तिरमखे निर्माते आहेत. तर मोहम्मद एस. बर्मावाला आणि डॉ. मयुर आण्णासाहेब तिरमखे दिग्दर्शित ‘लग्न कल्लोळ’ या चित्रपटाचे लेखन जितेंद्रकुमार परमार यांनी केलं आहे.
हेही वाचा – शशांक केतकरने घेतलं नवं घर, स्वतः खुलासा करत म्हणाला “मला सोशल मीडियावर…”
चित्रपटाबद्दल दिग्दर्शक, निर्माते डॉ. मयुर आण्णासाहेब तिरमखे म्हणाले, “चित्रपटात या तिघांच्या भूमिका आहेत, हे यापूर्वीच जाहीर झालं आहे. आता त्यांचे लूक प्रेक्षकांसमोर आले आहेत. या चित्रपटात प्रेक्षकांना धमाल पाहायला मिळणार आहे. हे कलाकारच इतके कमाल आहेत की, हे कल्लोळ करणार हे नक्की!’’