Siddharth Jadhav on His Anger Issues:सिद्धार्थ जाधव लवकरच ‘आता थांबायचं नाय’ या चित्रपटातून प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. या चित्रपटात त्याच्याबरोबर अभिनेते भरत जाधवदेखील दिसणार आहेत. त्यामुळे भरत जाधव व सिद्धार्थ जाधव या जोडीला पुन्हा एकदा पाहण्यासाठी प्रेक्षक उत्सुक आहेत.

याबरोबरच सिद्धार्थ जाधव ‘आता होऊ दे धिंगाणा’ या स्टार प्रवाहवरील शोचे सूत्रसंचालन करीत आहे. त्याचा उत्साह नेहमीच प्रेक्षकांचे लक्ष वेधून घेणारा असतो. विनोदी कलाकार, अशीही त्याची ओळख आहे. मात्र, आजपर्यंत अभिनेत्याने वेगळ्या धाटणीच्या भूमिका स्वीकारल्याचे पाहायला मिळाले आहे. आता नुकत्याच एका मुलाखतीत तो त्याच्या रागाविषयी व्यक्त झाला आहे. तो नेमकं काय म्हणाला आहे, हे जाणून घेऊ…

सिद्धार्थ जाधवने राग आल्यानंतर काय केलं होतं?

सिद्धार्थ जाधवने नुकतीच अजब गजब या पॉडकास्टला मुलाखत दिली. या मुलाखतीत तुला राग येतो का? राग आल्यावर तू कसा व्यक्त होतोस, असा प्रश्न विचारण्यात आला. त्यावर बोलताना सिद्धार्थ जाधव म्हणाला, “प्रचंड राग येतो. एकदा मी स्टूल तोडला होता. मी खूप रागीट होतो. माझ्या पप्पांनी मला सांगितलं की, राग हा विध्वंसक असतो. मला अजूनही तो शब्द आठवतो. राग येतो तेव्हा फक्त विध्वंस करतो. तो गेल्यावर कळतं की, सगळी तोडमोड झालीय.”

“आमच्या घरात पिठीभात, कुळदाची पिठी आणि भात बनायचा. सकाळी बनायचा आणि संध्याकाळीसुद्धा आम्ही तेच खायचो. मला वडील एकटेच कमवत आहेत, भाऊ शिकतोय या सगळ्याची जाणीव नव्हती. लोकांकडे अमुक या गोष्टी आहेत, आपल्याकडे नाहीत, असं मला वाटायचं. एके दिवशी आईनं मला जेवण वाढल्यानंतर काय ते पिठी-भात सारखं सारखं, असं म्हणून ते जेवण सरकवलं होत. तर मला पप्पा म्हणाले होते की, आपल्याला पिठी-भात तरी मिळतोय; असे काही लोक आहेत की, त्यांना एवढंसुद्धा मिळत नाही. त्याचा अनादर करू नको. पप्पांनी मला कधी मारलं नाही; पण अशा पद्धतीनं समजावून सांगितलं.”

“राग आला की, लगेच व्यक्त होऊ नका. कोणाला काहीतरी बोलायचं आहे. तर तुम्ही पटकन बोलू नका. त्यानं तुम्हाला दुखावलं म्हणजे तुम्ही त्याला दुखावलं पाहिजे, असं नाही. थोड्या वेळानं जाऊन बोला. कधी संताप अनावर झाला, तर तिथे तुम्ही थांबणं खूप गरजेचं आहे. तुम्ही कुठल्या व्यक्तीबरोबर वाद घालत आहात, कुठल्या पद्धतीनं वाद घालत आहात, हे पाहिलं पाहिजे. आपणच स्वत:कडे पाहण्याचा दृष्टिकोन बदलला पाहिजे.”

दरम्यान, सिद्धार्थ जाधव अनेकदा त्याच्या कुटुंबाबाबत बोलताना दिसतो. त्याच्या कुटुंबामुळे तो त्याच्या करिअरमध्ये प्रगती करीत असल्याचे त्याने अनेकदा वक्तव्य केले आहे. सिद्धार्थ जाधवची प्रमुख भूमिका असलेला आता थांबायचं नाय हा चित्रपट १ मे २०२५ ला प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. हा चित्रपट प्रेक्षकांना आवडणार का हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.