अभिनेता सिद्धार्थ जाधव सोशल मीडियावर नेहमीच चर्चेत असतो. इन्स्टाग्रामवर त्याचा बराच मोठा चाहतावर्ग आहे आणि सध्या सिद्धार्थ त्याचा आगामी चित्रपट ‘सर्कस’मुळे चर्चेत आहे. या चित्रपटात तो रणवीर सिंगसह स्क्रिन शेअर करताना दिसणार आहे. पण त्याआधी सिद्धार्थने त्याच्या इन्स्टाग्रामवर शेअर केलेला एक व्हिडीओ बराच चर्चेत आला आहे. या व्हिडीओमध्ये सिद्धार्थने त्याला केल्या जाणाऱ्या ट्रोलिंगवर स्पष्ट शब्दात प्रतिक्रिया दिली आहे.
सिद्धार्थ जाधवने त्याच्या अधिकृत इन्स्टाग्राम हॅन्डलवर एक व्हिडीओ शेअर केला आहे. हा व्हिडीओ ‘महाराष्ट्र टाइम्स’ला दिलेल्या अलिकडच्याच मुलाखतीतील आहे. या व्हिडीओमध्ये सिद्धार्थने त्याचं आतापर्यंतच करिअर, आयुष्य आणि करिअरमध्ये आलेले चढ-उतार, तसेच लूकवरून त्याला ट्रोल केलं जाणं या सर्वच गोष्टीवर आपलं मत व्यक्त केलं आहे.
आणखी वाचा- “२००३ ला मी ऑडिशन…” सिद्धार्थ जाधवने सांगितला ‘तुंबाड’ चित्रपटाबद्दलचा ‘तो’ किस्सा
या व्हिडीओमध्ये सिद्धार्थ म्हणतो, “आता मला २२ वर्षे झाली. या काळात बऱ्याच गोष्टी पाहिल्या, यश पाहिलं, अपयश पाहिलं आता लोक कौतुक करतात. काही लोक टीका करतात. पूर्वी करायचे आताही करतात. मला काय बोलतात माकड बोलतात ना. माकडासारखा दिसतो असं म्हणायचे तेव्हा पूर्वी मला वाईट वाटायचं. पण आता मला याचं वाईट वाटत नाही. माणसाची उत्क्रांती ज्याच्यापासून झाली त्या माकडाचा अंश माझ्यात आहे. याचा आनंद आहे. ते माकड माझ्यात आहे यात काय वाईट आहे. हे बदल स्वतःमध्ये करायला हवेत.”
सिद्धार्थ पुढे म्हणाला, “माझ्या आयुष्यात टीका करणाऱ्या लोकांचं बोलणं एन्जॉय करतो. आपल्या आजूबाजूला खरं बोलणारी माणसं फार कमी असतात. जे तुम्हाला सांगतात तू जे करतोयस ते चांगलं आहे पण तुला यापेक्षा जास्त काहीतरी करायचं आहे. ते तुम्हाला रिअलिटी चेक देतात. पण अशा खरं बोलणाऱ्या माणसांना आपण फार दूर पाठवलं आहे. आपण त्या माणसांना तोडतो. पण त्यांच्याकडून आपण शिकायला हवं. आयुष्यात अपेक्षा करणं कमी करायला हवं.”
आणखी वाचा- रणवीर सिंगने सर्वांसमोर सिद्धार्थ जाधवला धक्का दिला अन्… पुढे काय घडलं? पाहा व्हिडीओ
दरम्यान सिद्धार्थ जाधवच्या कामाबद्दल बोलायचं तर मराठी चित्रपटांनंतर सिद्धार्थने बॉलिवूड चित्रपटांमध्येही काही भूमिका साकारल्या आहेत. लवकरच तो रोहित शेट्टीच्या ‘सर्कस’ चित्रपटात दिसणार आहे. याशिवाय अलिकडेच प्रदर्शित झालेला ‘बालभारती’ हा त्याचा चित्रपट बराच चर्चेत होता. समीक्षकांच्या या चित्रपटाला चांगल्या प्रतिक्रिया मिळाल्या आहे.