सिद्धार्थ जाधव हा नेहमीच विविध कारणांनी चर्चेत असतो. मराठीबरोबरच हिंदी मनोरंजनसृष्टीतदेखील त्याने स्वतःची ओळख निर्माण केली आहे. त्याच्या कामाचं नेहमीच कौतुक होत असतं. पण इथपर्यंत पोहोचण्यासाठी त्याला मोठा संघर्ष करावा लागला आहे. आताही त्याला त्याच्या दिसण्यावरून लोक नावं ठेवत असतात. आता अशाच एका कमेंटला सिद्धार्थने उत्तर दिलं आहे.
इतक्या वर्षांच्या काळात सिद्धार्थला अनेकदा त्याच्या दिसण्यावरून ट्रोल केलं गेलं आहे. तो माकडासारखा दिसतो, असं अनेकदा त्याला ऐकावं लागलं आहे. याबाबत सिद्धार्थने बऱ्याचदा मुलाखतींमध्ये मोकळेपणाने भाष्यही केलं आहे. दिसण्यावरून होणारं ट्रोलिंग तो गांभीर्याने घेत नाही. आता एका नेटकऱ्याने त्याच्या फोटोवर कमेंट करत, “माकड दिसतोय,” अशी प्रतिक्रिया दिली. तर या कमेंटला सिद्धार्थनेदेखील त्याच्या शैलीत उत्तर दिलं आहे.
आणखी वाचा : Video: जॅकलिन फर्नांडिसने सिद्धार्थ जाधवला दिल्या मराठीत शुभेच्छा, म्हणाली…
सिद्धार्थ सोशल मीडियावर सक्रिय राहून त्याच्या चाहत्यांच्या नेहमीच संपर्कात असतो. तो वरचेवर त्याचे विविध फोटो सोशल मीडियावर पोस्ट करत असतो. नुकताच त्याने त्याच्या आगामी चित्रपटातील त्याचा एक फोटो पोस्ट केला. या फोटोमध्ये त्याने त्याचे केस निळ्या रंगाने हायलाइट केले असल्याचे दिसत आहे. त्यात बलून पॅन्ट, त्यावर टी-शर्ट आणि जॅकेट घालून तो समुद्रकिनारी हातात चित्रपटाचा फ्लॅप घेऊन उभा असल्याचं दिसत आहे.
हेही वाचा : “हे शहर आता…,” भरत जाधवने उघड केलं मुंबई सोडण्यामागचं खरं कारण
त्याची ही हटके स्टाईल पाहून नेटकऱ्यांनी या फोटोवर विविध प्रतिक्रिया दिल्या. अनेकांनी त्याला, ‘रणवीर सिंगच्या संगतीत राहण्याचा परिणाम,’ असंही म्हटलं. तर या फोटोवर कमेंट करत एका नेटकऱ्याने लिहिलं, “माकड दिसतोय.” या कमेंटला गांभीर्याने न घेता सिद्धार्थने उत्तर देत लिहिलं, “आहे तर मग दिसणारच ना भावा…” आता सिद्धार्थची ही कमेंट खूप चर्चेत आली आहे. या कमेंटला लाईक आणि प्रतिक्रिया देत अनेक जणांनी त्याच्या या स्वभावाचं कौतुक केलं आहे.