पुरस्कार हे प्रत्येक व्यक्तीसाठी कायमच स्पेशल असतात. आपण करत असलेल्या कामाची पोचपावती म्हणून पुरस्कार मिळणं याहून मोठं कौतुक नाही. त्यात पहिला पुरस्कार हा तर प्रत्येकासाठी कायमच जवळचा आणि अमूल्य असतो. असाच आयुष्यातील पहिला पुरस्कार मिळाला आहे तो अभिनेता सिद्धार्थ जाधवच्या आईला. एका विशेष पुरस्काराने सिद्धार्थ जाधवच्या (Siddharth Jadhav) आईचा गौरव झाला असून अभिनेत्याने याबद्दल कौतुकास्पद पोस्ट शेअर केली आहे.
मराठी सिनेसृष्टीचा एनर्जीटीक स्टार म्हणून अभिनेता म्हणून सिद्धार्थ जाधवला ओळखलं जातं. आपल्या दमदार अभिनयाच्या जोरावर प्रेक्षकांच्या मनात वेगळं स्थान निर्माण करणारा सिद्धार्थ सोशल मीडियावरही बराच सक्रिय असतो. सोशल मीडियावर तो त्याचे अनेक स्टायलिश फोटो शेअर करत चाहत्यांच्या संपर्कात राहत असतो. अशातच त्याने शेअर केलेली एक पोस्ट सध्या सर्वांचे लक्ष वेधून घेत आहे.
सिद्धार्थ जाधव आणि त्याचं आई-वडिलांवरील प्रेम हे सर्वांनाच ठाऊक आहे. आई-वडिलांबद्दलच्या अनेक पोस्ट तो सोशल मीडियावर शेअर करत असतो. तसंच अनेक मुलाखतींमधून त्याने आई-वडिलांविषयी भाष्य करताना दिसतो. अशातच त्याने आईला ‘महाराष्ट्र भूषण राजमाता जिजाऊ २०२५’ पुरस्कार मिळाल्यानिमित्त कौतुकास्पद पोस्ट शेअर केली आहे आणि तिचं अभिनंदनही केलं आहे.
सिद्धार्थने आईचा पुरस्काराबरोबरचा फोटो शेअर करत असं म्हटलं आहे की, “महाराष्ट्र भूषण राजमाता जिजाऊ पुरस्कार २०२५. ‘आदर्श माता पुरस्कार’ सौ. मंदाकिनी (तारा) रामचंद्र जाधव. आईला मिळणारा हा पहिला पुरस्कार… तोही राजमाता जिजाऊ यांच्या नावाने… अजून एक स्वप्नपूर्ती… आये आता थांबायच नाय! हार्दिक हार्दिक अभिनंदन”. सिद्धार्थची ही पोस्ट सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत असून अनेकांनी सिद्धार्थचं व त्याच्या आईचं कौतुक केलं आहे.
दरम्यान, सिद्धार्थच्या कामाबद्दल बोलायचं झालं, तर तो सध्या स्टार प्रवाहवरील ‘आता होऊदे धिंगाणा’ या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन करत आहे. या कार्यक्रमात तो अनेक टास्क आणि गेम खेळत प्रेक्षकांचे मनोरंजन करत आहे. तसंच लवकरच तो ‘आता थांबायचं नाय’ या चित्रपटातून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या चित्रपटात भरत जाधव, आशुतोष गोवारीकर, ओम भूतकरसारखे अनेक कलाकार आहेत. येत्या १ मे रोजी हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.