एखाद्या कलाकाराला प्रोजेक्टमधून अचानक काढलं जाणं ही त्या कलाकारासाठी साहजिकच मोठी आणि दु:खद गोष्ट असते. मात्र यातून अनेक कलाकारांना जावच लागतं. प्रत्येक कलाकाराच्या आयुष्यात असे प्रसंग येतंच असतात. असाच काहीसा प्रसंग अभिनेता सिद्धार्थ जाधवच्या (Siddharth Jadhav) आयुष्यात आला होता आणि याबद्दल त्याने स्वत: भाष्य केलं आहे. सिद्धार्थच्या अभिनयाचे आज लाखों चाहते आहेत. सिद्धार्थने आजवर हिंदी, मराठीसह इतर भाषांतील प्रेक्षकांचे मनोरंजन केलं आहे.
पण अभिनेत्याला त्याच्या संघर्ष काळात एका चित्रपटातून न सांगता काढण्यात आले होते. याबद्दल सिद्धार्थने अमोल परचुरेंच्या कॅचअप पॉडकास्टमध्ये सांगितलं आहे. यावेळी सिद्धार्थने असं म्हटलं की, “प्रत्येक माणसाच्या आयुष्यात पडाव यायलाच पाहिजे. ठेहराव यायलाच पाहिजे. त्या काळात माझे काही सिनेमे चालले नव्हते आणि फार सिनेमे आलेही नाहीत. मग असं झालं की आता काय होणार? मग एका सिनेमामधून तर मला काढलंच होतं.”
यापुढे तो म्हणाला की, “खरंतर तेव्हा मला त्या सिनेमाची गरज होती. कारण त्यात मराठीतले खूप मातब्बर अभिनेते होते. पण हे प्रत्येक कलाकाराबरोबर होतं. फक्त त्यावर तुम्ही कशी प्रतिक्रिया देता हे महत्त्वाचं असतं. तेव्हा मला कळलं नाही की, माझं कुठे चुकलं. कारण मी तर कमी पैसे घ्यायचो. कधी तर घ्यायचोच नाही. तेव्हा तो सिनेला माझ्याकडे आला आणि मी त्यांना ‘पैसे तुम्ही म्हणाल ते’ असं सांगितलं”.
यानंतर त्याने असं म्हटलं की, “त्यादरम्यान मी व्यवहाराचं तृप्तीकडे सांभाळायला दिलं होतं. तर त्यांनी तृप्तीने पैसे अधिक सांगितलं असं काही तरी कारण दिलं. त्यांना वेगळा नट घ्यायचा असेल किंवा मी माजोरडा वाटलो असेन असं काहीही असू शकतं. पण त्यांनी मला डावलल्याचा खूप राग आला आणि वाईटही वाटलं. त्या माणसाने बघू… सांगतो… असं म्हटलं होतं. पण नंतर मी त्या सिनेमाचं थेट म्युझिक लॉंच पाहिलं. तेव्हा मला असं झालं की, लोकांनी तू नाहीस हे सांगावं इतकीही तसदी घेतली नाही. तर हे प्रत्येकाच्या आयुष्यात येतं आणि यावं”.
दरम्यान, आजवर अनेक मालिका, नाटक आणि चित्रपटांमधुन प्रेक्षकांच्या भेटीला आलेला सिद्धार्थ जाधव सध्या स्टार प्रवाह वाहिनीवरील ‘आता होऊदे धिंगाणा’ या कार्यक्रमातून प्रेक्षकांचे मनोरंजन करत आहे. तर लवकरच त्याचा ‘आता थांबायचं नाय’ हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. यात त्याच्याबरोबर भरत जाधवही असणार आहेत.