Siddharth Jadhav : आपल्या दमदार स्टाईल आणि अभिनयाद्वारे प्रेक्षकांचं भरभरून मनोरंजन करणारा अभिनेता म्हणजे सिद्धार्थ जाधव. आपला सिद्धू म्हणून अभिनेता सर्वांनाच आपलंस करतो. आजवर त्याने मराठी, बॉलिवूड आणि बंगाली चित्रपटांतून काम केले असून त्याचा प्रचंड मोठा चाहता वर्ग आहे. नाटक, मालिका आणि चित्रपट या तिन्हीही माध्यमांद्वारे सिद्धार्थ प्रेक्षकांचे मनोरंजन करत आहे. यंदाच्या वर्षी त्याच्या करिअरला एकूण २५ वर्षे पूर्ण झाली. लवकरच त्याचा ‘आता थांबायचं नाय’ हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे.

सिद्धार्थ जाधवने सांगितला शूटिंगदरम्यानचा थरारक प्रसंग

या चित्रपटानिमित्त सर्व कलाकार प्रमोशनमध्ये व्यस्त आहेत. अनेक वृत्त आणि प्रसार माध्यमांना कलाकार भेटी देत आहेत आणि यानिमित्ताने ते चित्रपटातील काही किस्से, तसंच शुटींगदरम्यानच्या काही आठवणी शेअर करत आहेत. अशातच ‘आता थाबायचं नाय’च्या टीमने न्यूज १८ लोकमतबरोबर खास संवाद साधला. यावेळी सिद्धार्थने चित्रपटाच्या शूटिंगदरम्यानचा एक किस्सा सांगितला आहे. एका दृश्याचं चित्रीकरण करताना सिद्धार्थला त्याचा डोळा गमवावा लागला असता असं त्याने स्वत: सांगितलं आहे.

“पाण्याचा वेग माझ्या डोळ्याच्या वरच्या भागाला लागून गेला”

सिद्धार्थने शूटिंग दरम्यान झालेला किस्सा सांगताना असं म्हटलं की, “मी पहिल्यांदाच ही गोष्ट सांगत आहे. सांगण्याचा उद्देश एवढाच की, अपघात कसे होऊ शकतात. पण, ही मंडळी लोकांसाठी कशी तत्पर असतात. या चित्रपटात एक सीक्वेन्स आहे, ज्यामध्ये फुटलेल्या पाईपमधून पाणी अतिशय वेगाने बाहेर येत असतं. एक पाईप फुटलेला असतो आणि मारुती कदम येतो. त्याला ते सगळं मला नीट करायचं असतं आणि तो दुरुस्त करतो. हा सीन करताना मला काही अंदाज नव्हता आणि मला तो शूट करायचा होता. त्यादरम्यान, पाण्याचा वेग माझ्या डोळ्याच्या वरच्या भागाला लागून गेला.”

“पाण्याच्या वेगामुळे कदाचित मला डोळा गमवावा लागला असता”

त्यानंतर पुढे अभिनेता म्हणाला, “तेव्हा नक्की काय घडलं हे मला देखील माहित नव्हतं. त्यानंतर आम्ही आणखी एक सीन शूट केला. पण तेव्हा त्या पाण्याच्या वेगामुळे कदाचित मला डोळा गमवावा लागला असता. त्यानंतर मला त्याची तीव्रता जाणवली की, शूटिंग आहे म्हणून पाण्याचा इतका वेग आहे. पण, जेव्हा खरंच पाण्याची अशी काही समस्या असेल तेव्हा ही कर्मचारी मंडळी काय करत असतील? काय डोकं लावत असतील? असं असूनही ते प्रामाणिकपणे आपलं काम करतात. नित्य-नियमाप्रमाणे आपल्याला दिलेलं ते काम आहे या भावनेने ते काम करत असतात.”

‘आता थांबायचं नाय’मध्ये सिद्धार्थ जाधवसह कलाकारांची मांदियाळी

दरम्यान, ‘आता थांबायचं नाय’मधून महानगरपालिकेच्या कर्मचारी बांधवांची कहाणी सांगण्यात आली आहे. या चित्रपटात सिद्धार्थ जाधवसह भरत जाधव, अविनाश गोवारीकर, प्रवीणकुमार डाळिंबकर, ओम भुतकर, प्राजक्ता हनमघर, किरण खोजे, पर्ण पेठे, श्रीकांत यादव आणि रोहिणी हट्टंगडी ही कलाकार मंडळी आहेत. या चित्रपटाचे दिग्दर्शन अभिनेता शिवार वायचाळने केलं आहे. तर लेखन ओमकार गोखले, अरविंद जगताप आणि शिवराज वायचळ यांनी केले आहे.

‘आता थांबायचं नाय’मधून सिद्धार्थ आणि भरत जाधव अनोख्या भूमिकेत

येत्या १ मे रोजी म्हणजेच कामगार दिनानिमित्त ‘आता थांबायचं नाय’ हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या चित्रपटातून भरत जाधव आणि सिद्धार्थ जाधव ही जोडी पुन्हा एकदा प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. चित्रपटात दोघांच्या भूमिका अगदी अनोख्या आहेत. त्यामुळे आता या चित्रपटात हे दोघे काय कमाल करणार? याकडे त्यांच्या अनेक चाहत्यांचे लक्ष लागून राहिलं आहे.