सिद्धार्थ जाधव (Siddharth Jadhav) हा मराठी अभिनेता त्याच्या अनेक गाजलेले चित्रपट आणि भूमिकांसाठी ओळखला जातो. सिद्धार्थ जाधवने मराठीसह बॉलीवूडमध्येदेखील काम केले आहे. ‘सिम्बा’, ‘सूर्यवंशम’, ‘सर्कस’, ‘गोलमाल रिटर्न्स’, ‘राधे’ या चित्रपटांतील त्याच्या भूमिकांना प्रेक्षकांचे विशेष प्रेम मिळाले. आता सिद्धार्थ जाधवने एका मुलाखतीत जेव्हा तो रणवीर सिंह आणि दीपिका पादुकोणच्या लग्नाला गेला होता, त्यावेळी काय झालं होतं याबद्दल वक्तव्य केले आहे.

मी तृप्तीला दहाव्या मिनिटाला…

अभिनेता सिद्धार्थ जाधवने नुकतीच अमोल परचुरेंच्या कॅचअप या पॉडकास्टमध्ये हजेरी लावली होती. यावेळी रणवीर सिंह आणि दीपिकाच्या लग्नाला गेल्यानंतर काय झालं होतं, यावर त्याने वक्तव्य केले. सिद्धार्थ जाधव म्हणाला, “रणवीर सिंह आणि दीपिका मॅमच्या लग्नाला गेलो होतो, तृप्तीने माझी ती अवस्था पाहिली आहे. अमिताभ बच्चन, सचिन तेंडुलकर सरांपासून सगळी लोकं होती. मी सरांना शुभेच्छा दिल्या आणि पत्नी तृप्तीला दहाव्या मिनिटाला बोललो की जाऊयात. जायच्या आधी खूप उत्सुक होतो. मी रणवीर सरांना भेटलो, सगळ्यांना मी बघत होतो आणि मला दरदरून घाम फुटला. मी तृप्तीला दहाव्या मिनिटाला म्हटलं की चल, तर ती मला थांब म्हणत होती, कारण माझी अवस्था अशी होती की मादाम तुसामध्ये कसे सगळे पुतळे असतात आणि आपण त्यांना बघत असतो, हे असं होतं. कारण मी ज्या वसाहतीतून आलोय, जिकडे मी पडद्यावर या लोकांना पाहिलं आहे. कधीही वाटलं नव्हतं की या लोकांना मी भेटेन. कधी नाटक, सिनेमा असं काही करेन असं वाटलं नव्हतं; तर हे माझे क्षण आहेत आणि मी माणूस म्हणून जगण्याचा प्रयत्न करतो.

अभिनेता पुढे म्हणाला, “कुठल्याही पुरस्कार सोहळ्याला मला डान्स करायला मिळतो. फिल्म फेअरला मी तीन वर्ष सूत्रसंचालन केलं. पेपर टाकताना कधीतरी त्यामध्ये अशा सोहळ्यांचे फोटो बघायचो, आता त्यामध्ये होस्टिंग करतोय. ती ट्रॉफी हातात घेताना मी गहिवरलो, ती माझ्या मित्राबरोबर कुशल बद्रिकेबरोबर शेअर केली, कारण ही आमची स्वप्नं आहेत. झीने मला मराठी पाऊल पडते पुढेमध्ये पुरस्कार दिला होता. मी ढसाढसा रडलो होतो. मला माहीत होतं की, माझी समोर एव्ही वगैरे लागणार आहे, पण श्रेयस तळपदे सरांना हा पुरस्कार मिळाला होता. अजय-अतुल सरांना मिळाला होता, ते मी परफॉर्म केलं होतं. मराठी इंडस्ट्रीमधील कलाकार असं काही करतो तेव्हा त्याचं कौतुक होतं. माझ्या बाबतीतही हे झालं. चार वर्ष घरी बसल्यानंतर मी हे पाहिलं, तर मला वाटतं हे तुमचे क्षण असतात.”

दरम्यान, सिद्धार्थ जाधव लवकरच ‘आता थांबायचं नाय’ या चित्रपटातून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या चित्रपटात अभिनेते भरत जाधवदेखील महत्त्वाच्या भूमिकेत आहेत. भरत जाधव व सिद्धार्थ जाधव यांची जोडी लोकप्रिय आहे. त्यांनी एकत्र काम केलेले चित्रपट गाजले आहेत. हा चित्रपट १ मे २०२५ ला प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. तसेच ‘येरे येरे पैसा २’ मध्येदेखील सिद्धार्थ जाधव महत्त्वाच्या भूमिकेत आहे.