लोकप्रिय अभिनेता रितेश देशमुख(Riteish Deshmukh)’तुझे मेरी कसम’, ‘आऊट ऑफ कंट्रोल’, ‘डरना जरूरी है’,’ हाऊसफुल’, ‘हाऊसफुल २’, ‘हाऊसफुल ३’, ‘माऊली’, ‘वेड’, ‘मिस्टर मम्मी’, अशा अनेक चित्रपटांसाठी ओळखला जातो. रितेश देशमुख सध्या अभिनयाबरोबरच दिग्दर्शक व निर्मात्याच्याही भूमिकेत दिसतो. रितेश देशमुखने बिग बॉस मराठी ५ चे सूत्रसंचालनही केले आहे. अभिनेता त्याच्या चित्रपटांमुळे तसेच व्यावसायिक आयुष्यामुळे जितका चर्चेत असतो, तितकाच तो त्याच्या वैयक्तिक आयुष्यामुळेदेखील चर्चेत असतो. सोशल मीडियावर त्याने शेअर केलेल्या पोस्ट चाहत्यांचे लक्ष वेधून घेतात. आता सिद्धार्थ जाधव(Siddharth Jadhav)ने एका मुलाखतीत रितेश देशमुखबरोबर काम करण्याचा अनुभव सांगितला आहे.

मी आदित्यला त्रास द्यायला…

सिद्धार्थ जाधवने नुकतीच अमोल परचुरेंच्या कॅचअप या पॉडकास्टमध्ये हजेरी लावली होती. यावेळी त्याला एका चित्रपटातून न सांगता काढलं होतं, असा खुलासा त्याने केला. पुढे ‘फास्टर फेणे’ या चित्रपटातील भूमिका त्याला कशी मिळाली, याबद्दलही अभिनेत्याने वक्तव्य केले. सिद्धार्थ जाधव म्हणाला, “‘गेला उडत’ या नाटकाचे प्रयोग केले, त्यामुळे मला एक वेगळा आत्मविश्वास मिळाला. माझी मित्रमंडळी मला सांभाळत होती. माझा दादा मला बच्चन साहेबांची उदाहरणं देतो. फिटनेस व कमबॅकवर दादा मला अमिताभ बच्चन यांची उदाहरणे देतो. काम करत होतो, मला कसलीही व्यसनं नाहीत. पत्नी तृप्तीचा एक मित्र आहे, त्याला मल्याळम सिनेमाचा रिमेक करायचा होता. मी त्या फिल्मसाठी आदित्य सरपोतदारकडे गेलो. तो म्हणला की, मस्त फिल्म आहे, आपण ही करूयात. पण, मी आता ‘फास्टर फेणे’ करतोय. मी त्याला म्हटलं की, मला फास्टर फेणेमध्ये काम करायचं आहे. तो मला म्हणाला की, भूमिकाच नाही. मी त्याला म्हणालो की, कुठला असेल तो रोल दे. तो म्हणाला, इन्स्पेक्टरचा रोल आहे. मी ही भूमिका साकारतो असं त्याला म्हणालो. पण, ती भूमिका श्रीकांतने केली. मग तो म्हणाला की, भूमिका नाहीच. मग मी आदित्यला त्रास द्यायला लागलो.

आपण काही मित्रांचे फोन एका रिंगवर उचलतो ना, आदित्य सरपोतदार तर माझा मित्र आहे. पण, त्या काळात त्यालाही असं झालं की, आता मी सिद्धार्थला काय सांगू? मग एकेदिवशी त्याने माझा फोन उचलला. आदित्यने मला सांगितलं की, अरे सिद्धार्थ, त्याने ती भूमिका घेतली आहे. पण, मी त्याला म्हटलं की मला करायचं आहे. तो म्हणाला की, रिक्षावाल्याचा छोटासा रोल आहे. मी त्याला म्हटलं की करतो. आदित्य म्हणाला की, असं करू नकोस, मी तुझा गैरवापर करणार नाही. तो रोल कदाचित रितेश सर करतील. मी म्हणालो की मी करतो. मग मी स्क्रीप्ट ऐकली आणि ती भूमिका साकारली. अमेय वाघ, क्षितिज पटवर्धन या सगळ्यांबरोबर काम केलं. त्यांनी मला आणखी सकारात्मक केलं.”

‘फास्टर फेणे’ या चित्रपटाचा निर्माता रितेश देशमुख आहे. रितेश देशमुखबद्दल सिद्धार्थ जाधव म्हणाला, “‘फास्टर फेणे’मध्ये एक सीन आम्ही पुण्याला शूट केला. खूप गर्दी झाली, त्यामुळे मला हॉटेलला पाठवलं. त्यानंतर तो सीन शूट केला. मग मला रितेश सरांचा फोन आला. ते म्हणाले की, तुम्ही काळजी करू नका, आम्ही तुम्हाला चांगलं प्रेजेंट करू. त्यांनी मला लॉन्च केलं”, अशी आठवण सिद्धार्थ जाधवने सांगितली.

पुढे अभिनेता म्हणाला, मला दादा नेहमी सांगायचा की लोकांना मला काम द्या हे सांगायला लाजू नकोस. जोपर्यंत तू बोलत नाहीस की मला कामाची गरज आहे, तोपर्यंत लोकांना कसं कळणार? असे म्हणत भावाने काम नसेल तर इतरांकडे ते मागायला लाजू नकोस. तुझ्या स्वत:वर मेहनत घे, असे सांगितले. सिद्धार्थ जाधव म्हणाला, जेव्हा आपण संघर्ष करत असतो, तेव्हा स्वत:वर काम करणे गरजेचे आहे. ती जी वेळ मिळालेली आहे, ती तुमची उतरती कळा आहे की घरचा अभ्यास दिलाय हे समजायला हवं. हे त्या वयात कळत नाही, पण स्वत:ला कसं सांभाळू शकतो, त्याच त्याच गोष्टी बोलायच्या की सकारात्मक गोष्टी बोलायच्या हे ठरवता आलं पाहिजे.

दरम्यान, सिद्धार्थ जाधव ‘आता थांबायचं नाय’ तसेच ‘येरे येरे पैसा ३’मधून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. सध्या तो ‘आता होऊ दे धिंगाणा’ या स्टार प्रवाहवरील शोचे सूत्रसंचालन करताना दिसत आहे.