यंदाचा झी चित्रगौरव पुरस्कार खऱ्या अर्थाने अविस्मरणीय ठरला. अभिनय सम्राट अशोक सराफ यांना झी चित्रगौरव २०२२मध्ये जीवनगौरव पुरस्काराने सन्मानित करण्यात आला. या पुरस्कार सोहळ्यात त्यांच्या अभिनय क्षेत्रातील कारकिर्दीची झलक अभिनेता सिद्धार्थ जाधवने त्याच्या नृत्याविष्काराने प्रेक्षकांसमोर सादर केली.
झी चित्रगौरव पुरस्कार सोहळ्यातील एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला होता. या व्हिडीओत सिद्धार्थने अशोक सराफ यांना अनोख्या पद्धतीने दिलेली मानवंदना पाहून उपस्थितांचे डोळे पाणावलेले पाहायला मिळाले. सिद्धार्थ जाधवने साष्टांग नमस्कार घालून दिलेल्या अनोख्या मानवंदनेमुळे अशोक सराफही भारावून गेले होते. आता सिद्धार्थने झी चित्रगौरव पुरस्कार सोहळ्यातील एक फोटो शेअर करत अशोक सराफ यांच्यासाठी खास पोस्ट लिहिली आहे.
सिद्धार्थने अशोक सराफ यांच्या पायाजवळ बसलेला फोटो त्याच्या इन्स्टाग्रामवरुन शेअर केला आहे. अशोक सराफ यांच्याबरोबरचा खास फोटो शेअर करत सिद्धार्थने त्यांच्यासाठी भावनिक पोस्ट लिहिली आहे.
सिद्धार्थ जाधवची अशोक सराफ यांच्यासाठी भावनिक पोस्ट
अशोक सराफ… अशोक मामा… माझ्यासारख्या कित्तेक नवोदित कलाकारांसाठी असलेले द्रोणाचार्य आणि त्यांची मूर्ती मनात बसवून काम करू पाहणारे आम्ही एकलव्य….
त्यांच्या पायाशी कधी बसायला मिळेल असे स्वप्नातही वाटले नव्हते .पण आयुष्यातला हा खूप मोठा क्षण आहे जिथे त्यांच्या आयुष्याची कहाणी त्यांच्यासमोर मांडण्याची संधी मला मिळाली…
आणि अशोक मामांना ती मनापासून आवडली.. भारावल्या डोळ्यांनी त्यांनी कौतुक केलं.. आशीर्वाद दिले…
मामांना जीवन गौरव मिळाला हे आहेच पण त्यांच्यासमोर असा परफॉर्मन्स करून माझ्या जिवनाचं सार्थक झालं….
हा क्षण आयुष्यभर माझ्या लक्षांत राहील ….
हेही वाचा>> Video: टॉयलेट पेपरपासून ड्रेस बनवणाऱ्या उर्फी जावेदवर नेटकऱ्यांचा संताप, म्हणाले “रमजान महिन्यात…”
मालिका, नाटक व चित्रपट अशा सगळ्याच माध्यमात काम करुन अशोक सराफ यांनी प्रेक्षकांचं मनोरंजन केलं आहे. ‘अशी ही बनवाबनवी’, ‘धुमधडाका’, ‘आयत्या घरात घरोबा’, ‘साडे माडे तीन’, ‘शेजारी शेजारी’, ‘आमच्यासारखे आम्हीच’ हे त्यांचे गाजलेले चित्रपट. मराठीबरोबर त्यांनी हिंदी सिनेसृष्टीतही अभिनयाच्या जोरावर नाव कमावलं.