Siddharth Jadhav : मराठीसह हिंदी कलाविश्वात आपली ओळख निर्माण करणारा हरहुन्नरी अभिनेता म्हणून सिद्धार्थ जाधवला ओळखलं जातं. नुकतीच त्याच्या अभिनय क्षेत्रातील प्रवासाला तब्बल २५ वर्षे पूर्ण झाली आहेत. २६ जानेवारी २००१ मध्ये सादर केलेल्या ‘तुमचा मुलगा काय करतो?’ या नाटकातून सिद्धार्थने रंगभूमीवर पदार्पण केलं होतं. यानंतर हळुहळू प्रेक्षकांच्या मनात विशेष स्थान निर्माण करून सिद्धार्थ सर्वांचा ‘आपला सिद्धू’ झाला.

करिअरला २५ वर्षे पूर्ण होताच त्याने मोठी घोषणा केली आहे. सिद्धार्थ जाधव रंगभूमीवर पुनरागमन करणार आहे. ‘अ‍ॅनिमल’ असं या नाटकाचं नाव असून यानिमित्ताने सिद्धार्थ जाधव आणि महेश मांजरेकर १५ वर्षांनी पुन्हा एकदा रंगभूमीवर एकत्र काम करणार आहेत. यापूर्वी २०१० मध्ये दोघांनी ‘मी शारुक मांजरसुंभेकर’ या नाटकाचे शतकमहोत्सवी प्रयोग केले होते.

सिद्धार्थ जाधवने करिअरच्या पंचविशीत आणखी एक महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. अभिनेता आता निर्मिती क्षेत्रात पदार्पण करणार आहे. सिद्धार्थने आपल्या आई-वडिलांच्या नावाने स्वत:ची नाट्यनिर्मिती संस्था सुरू केली आहे. त्याच्या नाट्यनिर्मिती संस्थेचं नाव ‘ताराराम प्रॉडक्शन्स’ असं आहे. सिद्धार्थच्या आईचं नाव तारा आणि वडिलांचं नाव रामचंद्र यावरून ताराराम प्रॉडक्शन्स हे नाव ठेवण्यात आलं आहे.

‘मुंबई टाइम्स’ला दिलेल्या मुलाखतीत सिद्धार्थ जाधव म्हणाला, “मी सर्वसामान्य कुटुंबातून पुढे आलो आहे. माझ्या आई-वडिलांनी प्रचंड कष्ट करून आम्हा भावंडांना वाढवलं आहे. आई-बाबांसाठी काहीतरी खास करावं अशी अनेक वर्षांपासूनची इच्छा होती. मी त्यांच्यामुळे आज इथवर पोहोचलो आहे. त्यामुळे त्यांच्या नावाने निर्मितीसंस्था सुरू करताना मला विशेष आनंद होत आहे. यामध्ये माझ्या साथीला माझे गुरू महेश मांजरेकर आहेत. यामुळे मी प्रचंड आनंदी आहे.”

“स्वप्नपूर्ती… ‘ताराराम’ आई-वडिलांच्या नावाने निर्मितीसंस्था… महेश मांजरेकर सरांच्या आशीर्वादाने नवीन नाटक…लवकरच…जागतिक रंगभूमी दिनाच्या शुभेच्छा!” अशी पोस्ट शेअर करत सिद्धार्थने ही आनंदाची बातमी त्याच्या सर्व चाहत्यांना दिली आहे.

सिद्धार्थ जाधवची पोस्ट ( फोटो सौजन्य : लोकसत्ता ग्राफिक्स टीम )

दरम्यान, सिद्धार्थ जाधवने निर्मिती क्षेत्रात पदार्पण केल्यावर संपूर्ण कलाविश्वातून अभिनेत्यावर शुभेच्छांचा वर्षाव करण्यात येत आहे.