अभिनेता सिद्धार्थ जाधव आज मराठीमधील टॉपचा अभिनेता आहे. इतकंच नव्हे तर बॉलिवूडमध्येही त्याने काम करण्यास सुरुवात केली. पण यशाच्या शिखरावर पोहोचलेला हा अभिनेता म्हणजे अगदी सामान्य कुटुंबातील मुलगा. कलाक्षेत्रामध्ये पदार्पण करण्यापूर्वी त्याच्या घरची आर्थिक परिस्थिती अगदी बेताची होती. याबाबत त्याने एका कार्यक्रमामध्येही भाष्य केलं होतं. काही दिवसांपूर्वीच सिद्धार्थने त्याच्या आई-वडिलांसाठी मुंबईमध्ये एक खरेदी केलं.
स्टार प्रवाह वाहिनीवरील ‘आता होऊ दे धिंगाणा’ या कार्यक्रमामध्ये सिद्धार्थच्या कुटुंबियांनी हजेरी लावली होती. यावेळी सिद्धार्थने दादरच्या प्लाझा चित्रपटगृहाबाहेर माझे बाबा खाली पेपर टाकून त्यावर झोपायचे असं सांगितलं होतं. आता ‘महाराष्ट्र टाइम्स’ला दिलेल्या मुलाखतीमध्ये त्याने आईवर असणारं प्रेम व आईच्या काही आठवणी शेअर केल्या आहेत.
सिद्धार्थ एकदा नदीत बुडत असताना त्याच्या आईने त्याला वाचावलं. शिवाय दोनदा तो हरवला होता. अशाप्रसंगी त्याच्या आईनेच त्याला शोधून काढलं. याविषयी सिद्धार्थने स्वतःच खुलासा केला. शिवाय गोरेगावमध्ये त्याने त्याच्या आई-वडिलांसाठी अलिशान घर खरेदी केलं. आई-वडिलांना त्यांच्या हक्काचं घर घेऊन द्यायचं हे त्याचं स्वप्न होतं.
आणखी वाचा – राणादाने पाठकबाईंना किस करतानाचा फोटो शेअर केला अन्…; मराठमोळ्या जोडप्याच्या फोटोची सोशल मीडियावर चर्चा
मुंबईमध्ये स्थायिक झाल्यापासून आई-वडील भाड्याच्या घरात राहिले असंही सिद्धार्थने सांगितलं. पण आता त्याने त्याच्या आई-वडिलांसाठी कौतुकास्पद काम केलं आहे. घराच्या दारावर आई-वडिलांच्या नावाची पाटी पाहून त्यालाही अभिमान वाटतो. शिवाय दादरमध्ये प्लाझा चित्रपटगृहाच्या समोर असलेल्या टॉवरमध्येच सिद्धार्थचं एक घर आहे. मुलाची प्रगती पाहता सिद्धार्थचे आई-वडीलही आनंदात आहेत.