अभिनेता सिद्धार्थ जाधवने आपल्या अभिनयाची छाप मराठीसह बॉलीवूडमध्ये उमटवली आहे. लवकरच तो ‘अफलातून’ या चित्रपटातून प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे. पण त्यापूर्वी सिद्धार्थने मराठी प्रेक्षकांविषयीची भावना व्यक्त करत त्यांचे आभार मानले आहे.
‘राजश्री मराठी’ला दिलेल्या मुलाखतीमध्ये सिद्धार्थला मनातल्या भावना व्यक्त करण्यासाठी त्याला एक फोन लावायला सांगितला होता. त्याने हा फोन मराठी प्रेक्षकांना लावला आणि म्हणाला की, “मी २००० सालापासून चित्रपटसृष्टीत काम करतोय. ‘जत्रा’, ‘दे धक्का’, ‘अगं बाई अरेच्या’, ‘ श्वास’, ‘चेकमेट’, ‘दुनियादारी’ आणि ‘टाईम पास’ अशा अनेक चित्रपटांना तुम्ही भरभरून प्रतिसाद दिला होता. ‘दे धक्का’ला तर चित्रपटगृहात तुडुंब गर्दी भरली होती. मधल्या काळात माहिती नाही, काय झालं होतं. पण प्रत्येक मराठी कलाकार वाट पाहत होता. प्रेक्षक येऊ दे, आम्ही जे काम केलंय ते प्रेक्षकांपर्यंत पोहोचू दे, असं म्हणतं होता. मी असं म्हणतं नाही की, तुम्ही येतंच नव्हता, तुम्ही येत होता. तुम्हाला जसा वेळ मिळत होता तसा मराठी चित्रपट पाहत होता.”
हेही वाचा – तमन्ना भाटियाबरोबरचं अफेअर पब्लिसिटी स्टंट? विजय वर्मा उत्तर देत म्हणाला…
“पण कोविडनंतर ‘झिम्मा’पासून ज्या पद्धतीनं तुम्ही पुन्हा एकदा चित्रपटगृहाकडे परतलात. मला कधी कधी मुलाखतीत सांगावसं वाटतं, हे मायबाप रसिक प्रेक्षक आहेत. ज्यांनी सिल्वर जुबली केली, ७५-७५ आठवडे चित्रपटावर प्रेम केले. दादा कोंडकेंचे नाव गिनीज वर्ल्ड बुक ऑफ रेकॉर्डमध्ये नोंद करणारे तुम्हीच मायबाप रसिक प्रेक्षक होता. कुठेतरी एक मराठी कलाकार म्हणून तुम्ही चित्रपटगृहात यावं, तुम्ही चित्रपट पाहावा, मराठी चित्रपट धो-धो चालावा अशी माझी अपेक्षा होती.यावर्षी मी तुमचे मनापासून आभार मानतो. ‘वेड’ असेल, आताचा चालणार ‘बाईपण भारी देवा’ असेल किंवा दिग्पाल लांजेकरांचे चित्रपट असतील, तुम्ही त्यावर प्रचंड प्रेम करताय. तुम्ही चित्रपटगृहात गर्दी करताय. आजही ‘बाईपण भारी देवा’ चित्रपटासाठी तुडुंब थिएटर भरलेत.”
हेही वाचा – ‘मिशन इम्पॉसिबल 7’ चित्रपटासाठी टॉम क्रूजनं आकारलं ‘इतक्या’ कोटीचं मानधन, आकडा वाचून व्हाल थक्क
पुढे सिद्धार्थ म्हणाला की, “आम्ही असं ऐकायचो, दुसऱ्या इंडस्ट्रीमध्ये लोक चित्रपट हा सण, सोहळा असल्यासारखं बघायला जातात. आणि आज मी चित्रपटगृहात प्रेक्षक पाहतोय, नटूथटून, गॉगल लावून मराठी चित्रपट पाहायला येताय. मी खरं तुमचे मनापासून आभार मानतो. मी एक कलाकार आणि या इंडस्ट्रीचा भाग म्हणून हा आनंद शब्दात मांडू शकत नाही. आकडे, करोड यांच्यापलीकडे तुम्ही येताय, तुम्ही टाळ्या-शिट्या वाजवताय, तुम्ही प्रेम करताय, तुम्ही हसत हसत बाहेर पडताय, ही गोष्ट खूप सुखावणारी आहे. मराठी चित्रपट तुमच्या मनोरंजनासाठी आम्ही करत असतो. आणि यापुढे करत राहू. तु्म्ही फक्त असंच प्रेम करा. चित्रपटगृह तुडुंब भरू दे. तुमच्या मनोरंजनाची खात्री आम्ही देऊ. ‘बाईपण भारी देवा’ नंतर ‘ग्रेट भेट’, ‘अफलातून’ असे अनेक चित्रपट तुमचं असंच मनोरंजन करत राहतील. फक्त तुम्ही चित्रपटगृहात जा, एन्जॉय करा. पुन्हा एकदा मनापासून आभार. म्हणूनच मी तुम्हाला मायबाप म्हणतो, कारण पोर काम करतायत तुमच्या आनंदासाठी. तुमच्या चेहऱ्यावरचा आनंद हेच आमचं समाधान. धन्यवाद.”