मराठीसह हिंदी कलाविश्वात आपलं अढळ स्थान निर्माण करणारा लोकप्रिय अभिनेता म्हणून सिद्धार्थ जाधवला ओळखलं जातं. त्याचा चाहतावर्ग मोठ्या प्रमाणात आहे. वैयक्तिक आयुष्यात सिद्धार्थने मे २००७ मध्ये तृप्ती अक्कलवारशी प्रेमविवाह केला. जवळपास ५ वर्षे एकमेकांना डेट केल्यावर ही जोडी लग्नबंधनात अडकली होती.

मध्यंतरी तृप्तीने सोशल मीडियावरून तिचं सासरचं जाधव हे आडनाव का हटवलं याविषयी चर्चा रंगल्या होत्या. पण, ‘तृप्ती अक्कलवार’ अशी ओळख सांगण्यामागे एक खास कारण आहे. नुकत्याच कांचन अधिकारी यांच्या ‘बातो बातो में’ या शोमध्ये दिलेल्या मुलाखतीत तृप्तीने स्वत: माहेरचं आडनाव लावण्यामागचं कारण सांगितलं आहे. आयुष्यात ‘तृप्ती अक्कलवार’ अशी स्वत:ची वेगळी ओळख निर्माण करण्यासाठी, तिने व्यावसायिका म्हणून कसा तिचा प्रवास सुरू केला याबद्दल तृप्तीने तिचं सविस्तर मत या मुलाखतीत मांडलं आहे.

तृप्ती म्हणाली, “मी एक गोष्ट सांगते.. २०१३ मध्ये मी नोकरीमधून ब्रेक घेतला. प्रत्येक मुलीला घर, चूलमूल या गोष्टी चुकलेल्या नाहीत. त्यानंतर मी सिद्धार्थच्या तारखा, त्याचं कामकाज याकडे एक मॅनेजर म्हणून लक्ष घातलं. हळुहळू पैसे साठवून आम्ही वन बीएचके घर घेतलं. त्यानंतर २ बीएचके घर घेतलं. एकंदर आम्ही आयुष्यात एकत्र पुढे आलो. २०२० मध्ये लॉकडाऊन सुरू होतं. आता नवरा-बायकोमध्ये छोटी-मोठी भांडणं होत राहतात. त्यात सिद्धू मला बोलता-बोलता बोलून गेला की, ‘तुला कोण ओळखतं? तुला सगळे माझ्यामुळे ओळखतात. तुझी काय ओळख आहे? सगळे तुला सिद्धार्थ जाधवची बायको म्हणून ओळखतात… माझ्या मनाला ती गोष्ट खूप लागली.’ त्याच्या आज हे लक्षातही नसेल. त्यानंतर मी बसले, खूप विचार केला. घर सांभाळणं हे माझं कामच आहे पण, जेव्हा एखाद्या बाईच्या ओळखीचा प्रश्न येतो, तेव्हा स्वत:चं काहीतरी करावं लागतं. मग, मी जॉब करण्याचा प्रयत्न केला पण, सिद्धू व्यग्र होता त्यामुळे आपण मुलींना वेळ देऊ शकू की नाही हा प्रश्न होता. जर्नलिझममध्ये पुन्हा १२ तास काम करणं मला जमेल की नाही अशा अनेक गोष्टींचा विचार मी करत होते.”

तृप्ती पुढे म्हणाली, “१९-२० व्या वर्षी मला बिझनेसवुमन व्हायची इच्छा होती. ती इच्छा मग त्या क्षणाला जागृत झाली. पण, आता शून्यातून सुरुवात कशी करायची हा प्रश्न माझ्यासमोर उभा होता. बिझनेससाठी जवळपास ५० लाखांची गुंतवणूक करायची होती. आज कोणी विश्वास नाही ठेवणार पण, मी सिद्धूला यातलं काहीच सांगितलं नाही. कारण, मला त्याच्याकडून पैसे घ्यायचे नव्हते. मैत्रिणीच्या साथीने मी स्टार्टअप सुरू केला. तेव्हा मी एक गोष्ट ठरवली होती की, आयुष्यात नाव लावायचं ते फक्त ‘तृप्ती अक्कलवार’ असं नाव लावायचं. कारण, आपली ओळख आपण विसरून जातो…त्यामुळे सगळ्या बिझनेसमध्ये मी माझं ‘तृप्ती अक्कलवार’ असं नाव लावलं. मी सिद्धार्थची बायको आहे मी खोडू शकत नाही. मी इतकंही बोलेन की, सिद्धू सहज बोलून गेला पण, ती स्वत:ची ओळख निर्माण करण्याची मला प्रचंड गरज होती.”

तृप्ती झाली यशस्वी उद्योजिका

“स्वैरा एंटरप्राइजेस’ नावाने मी स्वत:ची कंपनी सुरू केली, त्यात साड्यांचा ब्रँड सुरू केला, दादरमध्ये मी प्रदर्शनं सुरू केली…‘स्वैरा एंटरप्राइजेस’ अंतर्गत मी बनारसी साडी, दुप्पटे विकले. सलोन सुरू केलं. यानंतर २०२५ मध्ये अलिबागला नागाव बीच आहे तिथे मी स्वत:चं होमस्टे सुरू केलं. तृप्ती कॉटेज असं त्याचं नाव आहे. हे कॉटेज सुरू केल्यावर सिद्धूने सुद्धा माझं कौतुक केलं होतं.” असं तृप्तीने यावेळी सांगितलं.

दरम्यान, तृप्तीच्या या मुलाखतीची झलक सिद्धार्थने इन्स्टाग्रामवर शेअर करत आपल्या बायकोचा उल्लेख ‘स्ट्राँगवुमन’ असा करत तिचं भरभरून कौतुक केलं आहे.