‘सा रे ग म प लिटिल चॅम्प्स’ हा कार्यक्रम काही वर्षांपूर्वी प्रेक्षकांच्या भेटीला आला आणि या कार्यक्रमाने प्रेक्षकांच्या मनात घर केलं. ‘सा रे ग म प लिटिल चॅम्प्स’च्या पहिल्या पर्वामध्ये आर्या आंबेकर, रोहित राऊत, प्रथमेश लघाटे, कार्तिकी गायकवाड आणि मुग्धा वैशंपायन हे टॉप ५ स्पर्धक ठरले. आज हे पाचही जण संगीत क्षेत्रात चांगली कामगिरी करताना दिसत आहेत.
हे पाचही जण त्यांच्या कामाबरोबरच यांच्या वैयक्तिक आयुष्यामुळेही नेहमीच सर्वांचे लक्ष वेधून घेत असतात. काही वर्षांपूर्वी कार्तिकी गायकवाड बंधनात अडकली, तर दोन वर्षांपूर्वी रोहित राऊतने जुईली जोगळेकरशी लग्न केलं. आता नुकतंच प्रथमेश लघाटे आणि मुग्धा वैशंपायन यांनी प्रेमाची कबुली दिली आहे. यानंतर आर्या आंबेकरच्या लग्नाची सोशल मीडियावर चर्चा रंगली. या सर्वांचं झालं पण तू कधी लग्न करणार? असा प्रश्न तिला नेटकऱ्यांकडून विचारला जाऊ लागला. आता आर्याने यावर मौन सोडलं आहे.
एका मुलाखतीमध्ये आर्या म्हणाली, “मी यावर्षी लग्न करणार या सर्व अफवा आहेत. मी यावर्षी खरोखर लग्न करत नाहीये. माझ्या लग्नाच्या बातम्या सतत पसरण्याचं कारण कार्तिकी गायकवाड आहे. आमच्या पाच लिटिल चॅम्प्सपैकी कार्तिकीने सगळ्यात आधी लग्न केलं. त्यामुळे सगळेजण माझ्या मागे लग्न करण्यासाठी लागले आहेत आणि त्यातूनच माझ्या लग्नाच्या अफवा पसरत आहेत. पण सध्या तरी माझा लग्नाचा अजिबात विचार नाही.”
हेही वाचा : यांचं ठरलं! प्रथमेश लघाटे आणि मुग्धा वैशंपायन यांनी दिली प्रेमाची कबुली, पोस्ट शेअर करत म्हणाले…
आर्याच्या या बोलण्याकडे आता सर्वांचं लक्ष वेधलं गेलं आहे. तिचा सध्या लग्नाचा विचार नाही असं तिने स्पष्ट सांगितल्यामुळे आता तिच्या लग्नाबद्दलच्या अफवांना पूर्णविराम लागला आहे.