‘सारेगमप लिटिल चॅम्प्स’मधून घराघरात पोहोचलेली गायिका केतकी माटेगावकर आता उत्कृष्ट अभिनेत्री झाली आहे. ‘तानी’, ‘शाळा’, ‘काकस्पर्श’, ‘टाइमपास’, ‘फुंतरू’, ‘अंकुश’ यांसारख्या चित्रपटातून तिनं आपल्या अभिनय कौशल्यानं प्रेक्षकांची मनं जिंकली आहेत. अशा या लोकप्रिय गायिका आणि अभिनेत्री असलेल्या केतकीने नुकतीच सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर केली आहे; ज्या पोस्टने सगळ्यांचं लक्ष वेधलं आहे. या पोस्टमधून केतकीने बॉडी शेमिंग करणाऱ्यांना चांगलंच सुनावलं आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

अभिनेत्री केतकी माटेगावकर सोशल मीडियावर खूप सक्रिय असते. नवनवीन फोटो आणि व्हिडीओ शेअर करत असते. पण ती बारीक असल्यामुळे अनेकदा तिला ट्रोल केलं जातं. आज केतकीने याच ट्रोलर्सना सडेतोड उत्तर देणारी खास पोस्ट शेअर केली आहे.

हेही वाचा- Video: ‘अ‍ॅनिमल’च्या यशानंतर बॉबी देओल झाला भावुक, नेटकरी म्हणाले, “तू चित्रपटात रणबीरला…”

केतकी माटेगावकरची पोस्ट वाचा…

प्रिय लोकं ज्यांना माझ्याप्रमाणे कधीकधी बॉडी शेमिंगचा सामना करावा लागतो….किती बारीक आहेस गं, अजून लहान मुलीचे कपडे घालतेस? अरे खात जा जरा, हं थंडी मानवलेली दिसतेय, मागच्या वेळेस भेटलो तेव्हा छान बारीक होतास, आता पोट सुटलंय का जरा?…नातेवाईक असो, ऑफिस मधले सहकर्मचारी असो, कोणीही असो…आपल्याला नेहमी या अशा वाक्यांना सामोरं जाव लागतं.

मी एवढं म्हणेन, यात मी तुमच्याबरोबर आहे. मी पूर्णपणे यामध्ये सामील आहे. पण तुमच्या शरीर रचनेचा अभिमान बाळगा. तुम्ही खूप सुंदर आणि अद्वितीय आहात. देवाने दिलेल्या या वेगळेपणाला महत्त्व द्या….जर एखादा डॉक्टर, आहारतज्ज्ञ, पालक किंवा तुमचे मित्र ज्यांना तुमची मनापासून काळजी असेल, तर तुम्हाला ते जे काही सांगत असतात, त्यांचं ऐका. अशी व्यक्ती नाही जी तुम्हाला खाली खेचून इच्छिते किंवा तुमचं वाईट विचार करते.

प्रिय ट्रोलर्स,
शरीर आपल्याला देवाने दिलेली देणगी आहे. मी तुमच्या भाषेत, स्किनी, (हाडांचा सापळा) बारीक आहे…हो आहे आणि तरी सुद्धा मला त्याचा अभिमान आहे. माझे वडील, माझे आजोबा सगळे बारीक तशी मी सुद्धा आहे बारीक…तरीही अजिबात न थकता १७-१८ तास शूट करताना हेच माझं शरीर माझी उत्तम साथ देतं…

थोडं वजन वाढवायला हवं का? तर हो असेल…पण म्हणून रोगी (Unhealthy) आहे का? तर अजिबात नाही…व्यायाम किंवा जीम हा फक्त वजन कमी करायला करतात असा विचार करणारे अजिबात व्यायाम करत नसावेत. काळजीने म्हणणं ठीके…पण अत्यंत हीन दर्जाच्या भाषेत कमेंट करणं, एका मुलीच्या शरीरावर, तिच्या शारिरीक भागा (Body Parts)वर खुलेपणाने कमेंट करणं, याला तुम्ही ‘स्वातंत्र्य’ आणि ‘शाब्दिक स्वातंत्र्य’ असं नाव देता.

आम्ही ट्रोलिंगपासून मुक्त झालो असलो तरी, १०० आणि १००० सुंदर लोकांच्या तुलनेत तुमची संख्या फार कमी आहे. जे आम्हाला पाठिंबा देतात आणि प्रेरित करतात. आम्ही कलाकार सुद्धा माणसं आहोत. आम्हालाही दुखापत होते. तुम्हाला सुद्धा घरात बहिणी असतील आई असेल. याचा विचार करा.

आणि काही लोकं असे ही असतील ज्यांना खरंच वैद्यकीय समस्या (Medical problem) असेल ज्यामुळे त्यांचं वजन कमी होत नसेल किंवा वाढत नसेल… कल्पना करा की, तुम्ही त्यांना कोणत्या भयंकर मानसिक अवस्थेमध्ये टाकत आहात. थोडे दयाळू आणि प्रेमळ व्हा. थोडी सहानुभूती बाळगा.

माझ्या सर्व प्रिय आणि सर्वात मौल्यवान चाहत्यांना:
तुमच्या सतत प्रेमासाठी, पाठिंब्यासाठी आणि निष्ठेसाठी खूप खूप धन्यवाद. मी जशी आहे तशीच मला स्वीकारल्याबद्दल धन्यवाद. तुम्ही मला समजून घेता. तुमचे सकारात्मक संदेश, मला प्रेरित करतात. सर्वात महत्त्वाच म्हणजे जेव्हा असं काही घडतं तेव्हा तुम्ही पहिले असतात, जे मला तुमच्या प्रतिक्रियेतून आणि पोस्टमधून हसवतात. मी तुमचे डीएमस आणि मेसेजच्या कमेंट वाचते. तुम्ही दिलेला पाठिंबा पाहून मी खूप भारावून गेले आहे.

मी नेहमीच एक कलाकार म्हणून आणि व्यक्ती म्हणूनही जास्तीत जास्त चांगलं होत जाण्याचा प्रयत्न करतेय आणि माझ्या गाण्यातून, कलेतून तुम्हाला प्रेम देण्याचा आणि मनोरंजन करण्याचा प्रयत्न करत राहीन…

खूप सारं प्रेम,
केतकी

हेही वाचा – ‘झी मराठी’ वाहिनीवरील ‘ही’ लोकप्रिय मालिका लवकरच घेणार प्रेक्षकांचा निरोप; कलाकारांनी शेअर केले शेवटचे खास क्षण

दरम्यान, केतकी माटेगावकरची ही पोस्ट सध्या सोशल मीडियावर व्हायरल झाली आहे. “दुर्लक्ष करत चला अशा कमेंट्सकडे. तुम्ही उत्तम काम करत आहात”, “स्वतःवर विश्वास ठेवा, लोकांना म्हणू द्या त्यांचे संस्कार दाखवत असतात ते….”, “आपली ओळख ही आपल्या कामातून होत असते.. तुम्ही अभिनय आणि गायन या दोन्ही क्षेत्रांमध्ये स्वतःची अशी वेगळी ओळख निर्माण केली आहे, इतरांना ते करण जमत नाही त्यांना नाव ठेवण्यात व्यस्त राहू द्या, तुम्ही दुर्लक्ष करा”, अशा प्रतिक्रिया या पोस्टवर केतकीच्या चाहत्यांनी केल्या आहेत.

मराठीतील सर्व मराठी सिनेमा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Singer and actress ketaki mategaonkar answer to trollers about body shaming pps