Ashok Samarth on his Hard Times: ‘सिंघम’, ‘सत्या २’, ‘रावडी राठोड’ अशा चित्रपटांतून मराठमोळ्या अशोक समर्थ यांनी त्यांच्या अभिनयाच्या जोरावर बॉलीवूडमध्ये स्वत:ची वेगळी ओळख निर्माण केली. मात्र, बॉलीवूडपर्यंत पोहोचण्याचा त्यांचा प्रवास सोपा नव्हता.

अशोक समर्थ यांनी नुकतीच एक मुलाखत दिली. या मुलाखतीत त्यांनी त्यांच्या कारकिर्दीतील अनेक आठवणी, किस्से सांगितले. त्याबरोबरच त्यांचा संघर्षाचा काळ कसा होता, यावरही त्यांनी वक्तव्य केले. ते नेमके काय म्हणालेत ते जाणून घेऊ…

९० रुपये २५ पैसे…

अभिनेते अशोक समर्थ यांनी नुकतीच ‘लोकमत फिल्मी’ला मुलाखत दिली. या मुलाखतीत त्यांना विचारले गेले की, अभिनयात क्षेत्रातील प्रवास कधी व कसा सुरू झाला? त्यावर अशोक समर्थ म्हणाले की, घरातून अभिनयासाठी विरोध होता. त्यामुळे घरातून पळून गेलो होतो. पहिल्या दोन वेळा मला घरी घेऊन गेले; पण तिसऱ्यांदा मी स्वत:चा आतला आवाज ऐकला. वाटलं की, जगेन, तरेन, मरेन; पण, मला गेलं पाहिजे. शाळेत असताना दोन-चार गोष्टींची पुस्तकं वाचलेली होती. त्याचा उपयोग झाला. कथाकथानाचा कार्यक्रम केला. मला आजही आठवतं की, त्याची ९० रुपये २५ पैसे, अशी चिल्लर गोळा झाली होती. ते पैसे एका रुमालामध्ये बांधले आणि तिसऱ्यांदा मी घरातून पळून गेलो.

अशोक समर्थ पुढे म्हणाले, “त्या ९० रुपये २५ पैशांत मी कोल्हापूर, सांगली, कराडमध्ये राहिलो. खरं तर त्याआधी कुठे जायचं, हे मला माहीत नव्हतं. मग कधी कोल्हापूर, कराडला राहिलो. तिथे माझा एक सहकलाकार आणि मी तिथून एकांकिका बारामतीला घेऊन गेलो. पहाटे ४ वाजून १० मिनिटं, अशी ती एकांकिका होती. तेव्हा पहिल्यांदा रंगमंचावर उभा राहिलो. तेव्हा एक वेगळा आत्मविश्वास आला. पण, ९० रुपयांची चिल्लर किती दिवस टिकणार? किती दिवस पुरणार? असा तो भयाण पद्धतीचा प्रवास करत करत पुणे गाठलं. पण, गोष्ट तिथे थांबत नाही.

मला कोणी कास्ट कऱणार नव्हतं

“मी जेव्हा पुण्यात आलो तेव्हा भाषेपासून सुरुवात झाली. रंगभूमीवर काम करायचं, तर तुमच्या भाषेचं शु्द्धीकरण होणं फार गरजेचं आहे. माझी अस्सल ग्रामीण भाषा होती. मग मी भाषा शुद्धीकरणाचे धडे घ्यायला सुरुवात केली. नाटक, एकांकिका चळवळीशी पुण्यात मी जोडला गेलो. तेव्हा माझं काम होतं निरीक्षण करणं. कारण- मला कोणी कास्ट कऱणार नव्हतं. माझ्याकडे ती सामग्री नव्हती.”

“मला आधी वाटायचं की, मला गोष्टी येतात. पण, नंतर लोकांना पाहिल्यानंतर वाटायचं की, ही वेगळ्या प्रकारची माणसं आहेत आणि आपण यांच्यात कुठेच बसत नाही. पेहराव, वावरणं असेल; त्यामुळे मी इतरांपेक्षा वेगळा वाटायचो. मी जेव्हा बारामतीला कॉलेजला जायचो तेव्हा लोक परफ्युम मारून यायचे; आज मीही मारतो. पण, तेव्हा आमच्या अंगाला शेण आणि गोमूत्राचा वास यायचा. कारण- आमचं ते दैनंदिन जीवन होतं. पहाटे तीन-साडेतीन वाजता उठायचं. शेण गोळा करायचं. जनावरांनी केलेलं ते शेण, गोमूत्र, अंगणात पडलेला पाला- पाचोळा हे काढणं.

“खतासाठी उकिरड्यावरती टाकणं आणि त्यानंतर अंघोळ, डबा, दप्तर व कॉलेजची पुस्तकं, असा दिवस सुरू व्हायचा. त्यामुळे ते नैसर्गिक परफ्युम होतं. त्या नैसर्गिक परफ्युमचा प्रभाव असणारी आम्ही माणसं या शहरांत कशी टिकणार? कारण- आमच्या शरीराच्या वासामुळे किंवा भाषेमुळे आम्हाला कायमस्वरूपी एका अंतरावर राहण्याची वेळ येते आणि हा अनुभव मी घेतलेला आहे.

“हळूहळू ओळखी होत गेल्या. एक नाटक करायचं होतं. बाळकृष्ण कोल्हटकरांचं एखाद्याचं नशीब हे नाटक होतं. त्याच्या दिग्दर्शिका विमलाबाई साठे होत्या. त्या म्हणाल्या की, बाळकृष्ण कोल्हटकरांचं नाटक करायचं आहे आणि तुझी भाषा तर विचित्र आहे. तर म्हटलं की मी मरेन; पण परत जाणार नाही. काय करायचं ते सांगा. त्यांनी माझ्यावर भाषेचे संस्कार केले. मी त्यांच्या घरात हे धडे घेत होतो. त्यांनी तेव्हा एक समोरच्या हॉटेलमधून एक ऑर्डर केली. मी ते पाहिल्यावर त्यांना म्हणालो की, हॉटेलमध्ये मला नोकरी द्यायला सांगा. त्यानंतर मी तिथे वेटरची नोकरी केली.”

“आयुष्यातला पहिला जॉब वेटरचा होता. मला ६०० रुपये मिळायचे. त्यानंतर मी पहिल्यांदा एका कॉट बेसिस रूममध्ये राहिलो. मधल्या काळात मी संभाजी पार्क, सारसबाग, रेल्वे स्टेशनवर झोपलो. फूटपाथ हे माझं झोपण्याचं ठिकण होतं”, अशा आठवणी सांगत, अशोक समर्थ यांनी त्यांच्या संघर्षाचा काळ समोर उभा केला आहे.