काही दिवसांपासून अभिनेत्री स्नेहल तरडे(Snehal Tarde) या चर्चेत आहेत. नुकताच त्यांनी दिग्दर्शित केलेला ‘फुलवंती’ हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे. या चित्रपटाद्वारे त्यांनी दिग्दर्शनात पहिले पाऊल टाकले आहे. आता त्यांनी एका मुलाखतीत चुलीवरचा स्वयंपाक यावर केलेले वक्तव्य चर्चेत आहे. नक्की त्या काय म्हणाल्या आहेत ते जाणून घेऊ.
स्नेहल तरडे यांनी सांगितले की, शहरातल्या घरात चूल का तयार केली?
स्नेहल तरडे यांनी नुकतीच ‘आरपार’ या यूट्यूब चॅनेलला मुलाखत दिली. या मुलाखतीत त्यांना विचारले की, तुम्ही मध्यंतरी सोशल मीडियावर घरात चूल केल्याचे फोटो शेअर केले होते. ते काय आहे? त्यावर उत्तर देताना स्नेहल तरडे यांनी म्हटले, “मला लहानपणापासून गावाकडे गेल्यावर तिथल्या स्वयंपाकघराचा वेगळा वास असतो. त्यात शेणाचा, चुलीचा वास असतो. एक वेगळंच वातावरण असतं. माहौल असतो एकदम मस्त. त्या वासानं मंत्रमुग्ध व्हायला होतं. तर तो वास आहे ना, त्या शेणाशी, मातीच्या चुलीशी असलेला बंध याची शहरामध्ये मला कुठेतरी कमतरता वाटत होती. मला ते रोज हवं होतं, म्हणून मी ठरवलं की, मी स्वत: आपला शेणाने सारवलेला ओटा बांधावा. त्याच्यावर एक चूल तयार करावी आणि जेव्हा जेव्हा शक्य असेल तेव्हा तेव्हा त्यावर स्वयंपाक करावा. त्या वासाचा परत एकदा अनुभव घ्यावा.”
“अनेकदा ही तक्रार असू शकते की, इच्छा असूनसुद्धा फ्लॅटमध्ये कशी काय चूल मांडायची? तर तुम्ही अगदीच मांडू शकता. जरी धूर झाला तरी आता चिमणी असते, त्याच्यातून धूर बाहेर जातो. तुमची तिथे गॅसची शेगडी असेल, तर मी जशी चूल गॅलरीमध्ये बांधलेली आहे, तशी चूल तुम्ही गॅलरीमध्ये करू शकता. लाकडं जर वाळलेली असतील, तर धूर होत नाही. चुलीवरच्या जेवणाला एक वेगळीच चव येते”, असे म्हणत त्यांनी शहरातल्या घरात चूल का केली याचे कारण सांगितले आहे.
दरम्यान, ‘फुलवंती’ या चित्रपटातून स्नेहल तरडे यांनी दिग्दर्शनात पहिले पाऊल टाकले आहे.