मराठी मनोरंजन विश्वातील लोकप्रिय अभिनेते म्हणून प्रवीण तरडेंना ओळखले जाते. अभिनयाबरोबरच प्रवीण तरडे एक उत्तम दिग्दर्शक आणि लेखकही आहेत. आत्तापर्यंत त्यांनी अनेक मराठी सुपरहिट चित्रपटांचे दिग्दर्शन केलं आहे. प्रवीण तरडे यांच्याप्रमाणेच त्यांची पत्नी स्नेहल तरडेही लोकप्रिय अभिनेत्री आहे. सोशल मीडियावर स्नेहल मोठ्या प्रमाणात सक्रिय असतात. निरनिराळे व्हिडीओ आणि फोटो शेअर करत त्या चाहत्यांना अपडेट देत असतात.
हेही वाचा- “हिंदी सिनेमांच्या गर्दीत…” सुबोध भावेची ‘झिम्मा २‘बद्दलची खास पोस्ट चर्चेत
नुकताच स्नेहल व प्रवीण तरडे यांच्या लग्नाचा १४ वा वाढदिवस झाला. या वाढदिवसानिमित्त स्नेहल तरडेंनी सोशल मीडियावर एक खास व्हिडीओ शेअर केला आहे. या व्हिडीओमध्ये स्नेहल यांनी प्रवीण तरडेंसाठी बीचवर रोमँटिक डिनरचं आयोजन केल्याचे दिसत आहे. दिव्यांची रोषणाई, आकर्षक सजावट केलेल्या टेंटमध्ये प्रवीण आणि स्नेहल कॅन्डललाईट डिनर करताना दिसत आहेत. वाढदिवसानिमित्त प्रवीण तरडेंनी बायकोला एक महागडी रिंग भेट म्हणून दिली आहे. प्रवीण आणि स्नेहल तरडेंचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. अनेक चाहत्यांनी या व्हिडीओवर कमेंट करत दोघांना लग्नाच्या शुभेच्छा दिल्या आहेत.
प्रायोगिक नाटकांमध्ये काम करताना पहिल्यांदा प्रवीण तरडे आणि स्नेहल यांची ओळख झाली. सुरुवातीला दोघांमध्ये मैत्री झाली आणि मैत्रीचं रुपांतर हळहळू प्रेमात झालं. परंतु, प्रवीण तरडे यांची त्या काळची आर्थिक परिस्थिती पाहता स्नेहल यांच्या घरच्यांचा त्यांच्या लग्नाला विरोध होता. स्नेहल आणि प्रवीण यांच्या वयात तब्बल १२ वर्षांचं अंतर आहे. अखेर २००९ साली दोघांनी लग्नगाठ बांधली.
प्रवीण तरडे यांच्या कामाबद्दल बोलायचं झालं तर ‘देऊळ बंद’, ‘मुळशी पॅटर्न’, ‘धर्मवीर’सारख्या सुपरहिट चित्रपटांचे त्यांनी दिग्दर्शन केलं आहे. तसेच ‘अग्निहोत्र’ आणि ‘असंभव’सारख्या गाजलेल्या मराठी मालिकांचे लेखनही प्रवीण तरडेंनी केलं आहे. आता लवकरच त्यांचा ‘धर्मवीर २’ चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. नुकताच या चित्रपटाचा मुहूर्त पार पडला.