‘बिग बॉस मराठी’फेम सूरज चव्हाण गेल्या वर्षभरात सर्वत्र चर्चेत होता. खेडेगावातून आलेल्या सूरजने त्याच्या साध्या स्वभावाने शहरातल्या अनेकांची मनं जिंकली. त्यामुळे आज सूरजचा मोठा चाहतावर्ग असून, सोशल मीडियावरही त्याचे लाखो फॉलोअर्स असल्याचं पाहायला मिळतं. तर ‘बिग बॉस’मुळे प्रसिद्धीझोतात आलेला सूरज आता मात्र एका नव्या रूपात प्रेक्षकांसमोर आला आहे.

केदार शिंदे दिग्दर्शित ‘झापुक झुपूक’ या २५ एप्रिल रोजी प्रदर्शित झालेल्या चित्रपटात सूरज मुख्य भूमिकेत झळकला. चित्रपटातील भन्नाट गाणी, गावरान तडका असलेले संवाद या गोष्टी उत्सुक्ता वाढवणाऱ्या होत्या. त्यामुळे सूरजची मुख्य भूमिका असलेला हा चित्रपट बॉक्स ऑफिसवरही चांगली कमाई करील, असं म्हटलं जात होतं.

‘बिग बॉस मराठी’च्या ५व्या पर्वात प्रेक्षकांनी सूरजला उचलून धरलं. त्याला मोठ्या प्रमाणात पाठिंबा दिल्याचं पाहायला मिळालं. त्यामुळे सूरज त्याच्या या पहिल्यावहिल्या चित्रपटासाठी प्रचंड उत्साही असल्याचं पाहायला मिळालं. मात्र, चित्रपट प्रदर्शित होऊन आज चौथा दिवस आहे; परंतु अद्याप चित्रपटानं चांगली कमाई केल्याचं पाहायला मिळालं नाही. प्रेक्षक चित्रपटगृहामध्ये गर्दी करताना दिसले नाहीत.

अशातच सोशल मीडिया इन्फ्लुएन्सर प्रसाद वेदपाठक व दीपिका वेदपाठक यांनी या संदर्भात सोशल मीडियावर स्टोरी पोस्ट केली आहे. प्रसाद व दीपिका ‘झापूक झुपूक’ पाहण्यासाठी चित्रपटगृहात गेल्याचं या व्हिडीओमध्ये पाहायला मिळतं. यावेळी त्यांनी सूरजचं भरभरून कौतुक केल्याचं दिसतं. सूरजने पडद्यावर अप्रतिम काम केल्याचं त्यांनी म्हटलं आहे.

त्यामध्ये त्यांनी म्हटलं आहे, “वाईट या गोष्टीचं वाटतं की, थिएटर रिकामं आहे. एक नंबर काम केलं आहे. सूरजनं खूप छान अभिनय केला आहे. छान वाटतं की, केदारसरांनी त्याच्याकडून खूप चांगल काम करून घेतलं. अजिबात अपेक्षा नव्हती की, सूरज इतकं छान काम करेल. दिग्दर्शन व कथा अजून चांगली असू शकत होती; पण सूरज तू कमाल काम केलंस”.

प्रसिकाची इन्स्टाग्राम स्टोरी

एकंदरीत याबद्दल बोलताना ते पुढे म्हणाले, “आम्ही सूरजला पहिल्यांदा टिक टॉकवर पाहिलं होतं तेव्हा आम्हाला काहीतरी विचित्र वाटलं म्हणून आम्ही त्याला फॉलो केलं; पण एवढं माहीत होतं की, पोरगा जिद्दी आहे आणि आज तो जिथे पोहोचला आहे, ते पाहून मला वाटतं की, इन्फ्लुएन्सर म्हणून चित्रपटात मुख्य कलाकार म्हणून काम करणारा तो पहिलाच आहे.”

प्रसिका इन्स्टाग्राम स्टोरी

त्यासह त्यांनी मराठी चित्रपटांच्या शोबद्दल वक्तव्य केलं आहे. शेअर केलेल्या स्टोरीमध्ये ते असं म्हणाले, “या चित्रपटाला शो खूप कमी मिळाले आहेत आणि प्रेक्षकसुद्धा चित्रपट बघायला आले नाही. बॉलीवूड चित्रपटांना जर एवढा पाठिंबा देऊ शकता, तर मग आपल्या मराठी चित्रपटांना का नाही. सूरज इन्फ्लुएन्सर असल्यानं चित्रपटाच्या प्रमोशनसाठी या गोष्टीचा वापर करायला हवा होता; पण तसं का केलं गेलं नाही हे माहीत नाही.

प्रसिका इन्स्टाग्राम स्टोरी



दरम्यान, २५ एप्रिल रोजी प्रदर्शित झालेल्या ‘झापुक झुपूक’ चित्रपटामध्ये सूरज चव्हाणसह अभिनेत्री जुई भागवत, इंद्रनील कामत, मिलिंद गवळी, दिपाली पानसरे यांसारखे कलाकार महत्त्वाच्या भूमिकेत पाहायला मिळत आहेत. तर या चित्रपटात अभिनेते मिलंद गवळी व दिपाली पानसरे यांनी नारायणीच्या म्हणजेच जुई भागवतच्या आई-वडिलांची भूमिका साकारली आहे. तर ‘झापुक झुपूक’ मध्ये भन्नाट गाणी असलेली पाहायला मिळत आहे. चित्रपटाच्या प्रमोशन दरम्यान, सूरजचे या गाण्यावरील अनेक रील व्हायरल झाले आहेत.