Marathi Actress Tejashree Jadhav Photos: मराठी अभिनयविश्वात लगीनघाई सुरू आहे. रेश्मा शिंदे, किरण गायकवाड व वैष्णवी कल्याणकर, श्रद्धा रानडे, शाल्व किंजवडेकर आणि आता शिवानी सोनारपाठोपाठ आणखी एक मराठी अभिनेत्री लग्नबंधनात अडकणार आहे. साखरपुडा केल्यानंतर जवळपास वर्षभराने लग्न करणार आहे. सध्या तिच्या बॅचलर पार्टीचे फोटो चर्चेत आहेत.
‘बलोच’ या मराठी चित्रपटात झळकलेली अभिनेत्री तेजश्री जाधव लवकरच लग्न करणार आहे. तिने इन्स्टाग्रामवर तिच्या बॅचलर पार्टीचे काही फोटो पोस्ट केले आहेत. यात तेजश्रीबरोबर तिचे मित्र-मैत्रिणी दिसत आहेत. तेजश्रीने तिच्या बॅचलर पार्टीमध्ये एक छान शॉर्ट वनपीस घातला होता. तिने केक हातात घेऊन काढलेले काही फोटो पोस्ट केले आहेत.
पाहा पोस्ट –
दरम्यान, तेजश्रीने १४ मार्च २०२४ रोजी साखरपुडा उरकला होता. तिच्या होणाऱ्या पतीचे नाव रोहन सिंह आहे. रोहनने तिला साखरपुड्याच्या काही दिवसांआधी समुद्रकिनारी प्रपोज केलं होतं. त्यानंतर पारंपरिक पद्धतीने त्यांनी साखरपुडा केला. आता तिने तिच्या बॅचलर पार्टीचे फोटो पोस्ट केले आहेत. तेजश्री व रोहन लवकरच लग्नबंधनात अडकणार आहेत. तेजश्रीने अद्याप तिच्या लग्नाची तारीख जाहीर केलेली नाही.
तेजश्री दाक्षिणात्य चित्रपटात आपल्या अभिनयाची छाप उमटवणारी मराठी मुलगी म्हणून ओळखली जाते. तेजश्रीने २०१६ मध्ये अभिनेत्री सोनाक्षी सिन्हाची मुख्य भूमिका असलेल्या ‘अकिरा’ चित्रपटातून बॉलीवूडमध्ये पदार्पण केलं होतं. त्यानंतर ती ‘अट्टी’ या तामिळ चित्रपटात झळकली होती. यानंतर ती ‘माधुरी टॉकीज’, ‘द जोकर : अ स्ट्रेंज किडनॅपर’ या हिंदी वेब सीरिजमधून प्रेक्षकांच्या भेटीला आली. तेजश्री ही ‘बलोच’ या मराठी चित्रपटातही झळकली होती. यात तिने तानाबाईंची भूमिका साकारली होती. हा तिचा पहिलाच मराठी चित्रपट होता.