अनेक चित्रपट, मालिका करीत आपली वेगळी ओळख निर्माण करणारी अभिनेत्री म्हणजे सोनाली खरे. ‘सावरखेड एक गाव’, ‘चेकमेट’ अशा चित्रपटांमुळे सोनालीने लोकप्रियता मिळवली. सोनालीचा नवाकोरा सिनेमा मायलेक लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. तिच्या खऱ्या आयुष्यातली लेक या चित्रपटात तिच्या लेकीची भूमिका साकारणार आहे. नुकताच चित्रपटाचा ट्रेलर लॉंच सोहळा पार पडला असून, चित्रपटाच्या प्रमोशनसाठी सोनाली सध्या अनेक मुलाखतींमध्ये पाहायला मिळतेय.
नुकत्याच ‘प्लॅनेट मराठी’ला दिलेल्या मुलाखतीत सोनालीने एक धक्कादायक अनुभव शेअर केला. २६/११ च्या दहशतवादी हल्ल्याच्या दिवशी सोनाली आणि तिचा पती बिजय आनंद ताज हॉटेलमध्ये अडकले होते आणि दोघं लेक सनायापासून दूर होते. त्याबद्दलचा अनुभव शेअर करताना सोनाली म्हणाली, “दुसरा जन्म आहे माझा, असं मी नेहमी म्हणते. कारण- त्या रात्री आम्हाला अशी अजिबात आशा नव्हती की, आम्ही सुखरूप बाहेर पडू. सनाया चार महिन्यांची होती. आम्हाला बाहेर जायचं होतं; पण कधी जाणं व्हायचं नाही. माझे मिस्टर म्हणाले की, चल, आज मी तुला ताज हॉटेलला डेटवर घेऊन जातो आणि म्हणून आम्ही तिथे गेलो होतो. तेव्हा मी तिथेच जवळ राहायचे म्हणून मुलीला मी घरी ठेवून गेलेले. एक तासाभरात येईन, असा विचार करून मी गेले आणि आम्ही आत शिरलो. अचानक त्या सगळ्याची सुरुवात झाली आणि दुसऱ्या दिवशी सकाळपर्यंत आम्ही तिथे अडकलो होतो.”
हेही वाचा… “…आणि मी ट्रेनमधून पडले”; मुक्ता बर्वेने सांगितला मुंबईत आल्यानंतरचा ‘तो’ अनुभव, म्हणाली…
“सगळ्या घडामोडी कळत होत्या. इकडून माणसं सुटतायत आणि तिकडून येतायत; पण आमची सुटका दिसत नव्हती. मग मी माझ्या आईला, सासूला, माझ्या मित्र-मैत्रिणींना हळूहळू एक-एक फोन करायला सुरुवात केली होती की, मला काही वाटत नाही आहे की, आता आम्ही इथून येऊ. तेव्हा माझ्या डोक्यात मुलीच्या भविष्याची प्लॅनिंग सुरू झाली होती. नशिबानं आम्ही दुसऱ्या दिवशी सुखरूप बाहेर पडलो,” असं सोनाली म्हणाली.
“मी घरी गेले आणि आश्चर्याची गोष्ट अशी की, माझी चार महिन्यांची लेक अजिबात उठली नव्हती आणि मला तिची भीती होती की, तिला भूक लागली, तर काय होईल? कारण- घरी कोणी नव्हतं; फक्त माझी सांभाळणारी मुलगी होती. आई वगैरे त्या दिवशी तिच्या घरी होते आणि ती एकटी होती. त्याहून मला ही भीती होती की, सगळीकडेच दहशतवादी पसरलेले होते. तेव्हा मी माझ्या शेजाऱ्यांना फोन करून ठेवलेला की, कृपया घरी जाऊन बेल वाजवू नका; नाही तर माझी लेक उठेल. पण, लक्ष ठेवा आणि तुम्हाला माहीत असू दे की आम्ही घरी नाही आहोत आणि ती एकटी आहे. लहान मुलं दर दोन-तीन तासांनी उठतात; पण देवाला काळजी होती म्हणून की काय माझी मुलगी रात्रभर झोपूनच होती”, असंही सोनालीने नमूद केले.
दरम्यान, ‘मायलेक’ चित्रपटातून सनाया सिनेसृष्टीत पदार्पण करीत आहे. या चित्रपटात सोनाली खरे आणि सनाया आनंदसह उमेश कामत, बिजय आनंद, संजय मोने, शुभांगी लाटकर, महेश पटवर्धन यांच्याही महत्त्वाच्या भूमिका आहेत. १९ एप्रिल २०२४ रोजी हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.