अभिनेत्री सोनाली कुलकर्णी(Sonali Kulkarni)ने आजपर्यंत अनेक चित्रपटांतून प्रेक्षकांचे मनोरंजन केले आहे. नुकत्याच तिच्या एका पुस्तकाचा प्रकाशन सोहळा पार पडला. ‘सो कूल टेक २’ असे या पुस्तकाचे नाव आहे. या पुस्तक प्रकाशन सोहळ्याला अनेक नामांकित कलाकारांनी हजेरी लावली होती. लोकप्रिय अभिनेत्री सोनाली बेंद्रेदेखील या सोहळ्याला उपस्थित होती. आता मात्र अभिनेत्री तिच्या कोणत्या भूमिका किंवा पुस्तकामुळे नाही, तर तिच्या एका वक्तव्यामुळे चर्चेत आली आहे. सोनाली कुलकर्णीने नुकतीच एक मुलाखत दिली. त्यामध्ये तिने आई-वडिलांविषयीच्या तिच्या भावना व्यक्त केल्या आहेत. अभिनेत्रीने नेमके काय म्हटले आहे, ते जाणून घेऊ.
त्यामुळे तिला फार तीव्र वेदना…
सोनाली कुलकर्णीने नुकतीच व्हायफळ या पॉडकास्टमध्ये हजेरी लावली होती. यावेळी तिला विचारण्यात आले की तिच्या आई-वडिलांची तिची आवडती गोष्ट कोणती? त्यावर बोलताना अभिनेत्रीने म्हटले, “माझी आई देवासमोर त्या-त्या वारानुसार रोज रांगोळी काढते. काहीतरी छोटासा बदल असतो आणि मला तशीच रांगोळी देवासमोर काढायला आवडते. आईच्या आणि माझ्या रांगोळीतल्या रेषा वेगळ्या असतात. आमच्या हाताचं वळण वेगळं आहे. मी कधी कधी रेखीव काढते आणि आई सहजपणे काढते. त्या रांगोळीवरचं जे हळद-कुंकू असतं, ते सहज असतं.”
पुढे बोलताना अभिनेत्रीने म्हटले की, त्या दोघांमध्ये सुंदर गोष्ट आहे ती म्हणजे वाया न घालवणं. खाऊचा एक कण असो, प्लास्टिक न वापरणं, वेळेची किंमत करणं, या त्यांच्या गोष्टी फार छान आहे. त्या दोघांचं सहजीवन मला फार आवडतं. गेली दोन वर्षं माझ्या आईला पाठीच्या कण्याचा त्रास चालू झालाय आणि त्यामुळे तिला फार तीव्र वेदना होतात. या कारणामुळे माझी आईच बदलली आहे. ती जी होती, तशी राहू शकत नाहीये आणि या जाणिवेनं मला जो त्रास होतो, तो मला सांगताच येत नाही. आता आपले आई-बाबा ते नाहीयेत, जे त्यांच्या जोशाच्या काळात होते. पण, त्या दुखण्यावर मात करूनही माझी आई इतकी हसतमुख असते. छोट्या-छोट्या गोष्टींमध्ये ती रमलेली असते, हे मला फार कौतुकास्पद वाटतं. माझ्या आई-वडिलांनी स्वत:ला माणूस म्हणून जे घडवलं, ते मला भयंकर विलोभनीय वाटतं. माझे बाबा ज्येष्ठ नागरिक आहेत. त्यांचं म्हणणं असतं की, मी एसटीनं जातो. आम्हाला अर्ध तिकीट असतं किंवा मोफत प्रवास आहे. त्यांचं बरोबर आहे. पण, मला असं वाटतं की कशाला, आपल्याकडे गाडी आहे. तर ते एसटीनं जाईन, असं म्हणतात. तर हे जे एखाद्या गोष्टीचं मूल्य ठेवण्याची वृत्ती आहे. ती फार विलक्षण आहे. मिनिमलिस्टिक (कमी गरजांमध्ये जगणं) जगणं ही आताची संकल्पना आहे; पण काही जणांच्या आचरणात ते आधीच असतं. ते माझ्या आई-बाबांच्या वृत्तीत आहे. त्या दोघांची वृत्ती मला खूप आवडते. आजपर्यंत मी त्यांना कुठल्याही गोष्टीचा बाऊ करताना पाहिलं नाहीये.
याच मुलाखतीत सोनाली कुलकर्णीने मनातील खंत व्यक्त करीत म्हटले, “माझे आई-बाबा आता इतके गोड झालेत की, मला त्यांना सारख्या मिठ्या माराव्याशा वाटतात. ते किती वर्ष मी केलंच नाही. असे कितीतरी क्षण आहेत जेव्हा मला माझ्या आईला मदत करण्यासाठी पुण्याला पोहोचायचं होतं. कारण-तिनं केलेले कष्ट मी फार जवळून पाहिले आहेत किंवा माझ्या बाबांनी उन्हातान्हात एसटीनं केलेला प्रवास, पैसे नव्हते, हे सर्व मी पाहिलेलं आहे. हे जे कष्ट असतात, तेव्हा आपण का मोठे होत नाही? याचं मला खूप वाईट वाटतं. आता पैसे मिळवून आणि मोठे होऊन काय उपयोग आहे. मला त्यांना जे द्यायचं आहे, ते आता त्यांना नको आहे आणि कदाचित आपल्या हातात एवढंच असतं की, आपण तो दिवस आनंदाने जगूयात. आपण घरी आल्यानंतर आपल्या आई-बाबांकडे बघूयात. त्यांचा हात हातात धरून त्यांच्याजवळ बसूया. छान काहीतरी खाऊयात, एकत्र बसूयात. मला असं वाटतं की, मित्र-मैत्रिणींचे हेवेदावे पटकन मिटतात. पण, जवळच्या घरगुती वातावरणात अनेकांच्या बऱ्याच न बोललेल्या गोष्टी राहून जातात. या सगळ्याला बाजूला करून जी माणसं आपली आहेत, त्यांना आपल्यातलं सगळं आपण बेहिशोबीपणे प्रेम देऊन टाकायला पाहिजे.”