सोनाली कुलकर्णी(Sonali Kulkarni) लवकरच ‘सुशीला सुजीत’ या चित्रपटातून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या चित्रपटात अभिनेत्रीबरोबर प्रमुख भूमिकेत स्वप्नील जोशी दिसणार आहे. चित्रपटाचे दिग्दर्शन प्रसाद ओकने केले आहे, तर चित्रपटाची निर्मिती स्वप्नील जोशी, मंजिरी ओक, प्रसाद ओक यांनी केली आहे. हा चित्रपट १८ एप्रिल २०२५ ला प्रदर्शित होणार आहे. आता अभिनेत्री सोनाली कुलकर्णीने एका मुलाखतीत विद्या बालन(Vidya Balan)बरोबर पहिली भेट कशी झाली होती, याचा खुलासा केला आहे. तसेच अभिनेत्रीचे तिचे कौतुक केले आहे.
“एक सुंदर मुलगी…”
सोनाली कुलकर्णीने नुकतीच ‘राजश्री मराठी’ला मुलाखत दिली. या मुलाखतीत अभिनेत्रीने विद्या बालनच्या पहिल्या भेटीचा किस्सा सांगितला. सोनाली कुलकर्णी म्हणाली, “मी खूप जाहिरातीत काम केले आहे, त्यासाठी खूप ऑडिशन्स दिल्या आहेत. १९९७-२००० या काळात ७०-८० जाहिरातीत काम केलं असेल. तेव्हा आम्ही मोबाइलवर टेस्ट करून पाठवायचो नाही. आम्ही ऑडिशन द्यायला जायचो. तर माझं सिलेक्शन व्हायचं आणि मला जाहिरातीत काम मिळायचं. तर एकदा मी सॅमसोनाईटच्या जाहिरातीच्या शूटिंगसाठी मद्रासला चालले होते. मी एकटीच होते. एक सुंदर मुलगी तिच्या आई आणि बहिणीबरोबर विमानतळावर बसलेली दिसली होती. विमान मद्रासला उतरलं. मागचं दार उघडणार होतं, म्हणून मी पुढून मागे चालले होते; तर विमानतळावर दिसलेली मुलगी मला परत दिसली आणि मला ती म्हणाली की, तुम्ही ‘दोघी’ या सिनेमात होता ना? मी म्हटलं की हो. तुला मराठी समजतं का? तर ती मला म्हणाली की हो. खूप चांगला चित्रपट आहे. मला तुमचं काम खूप आवडलं. तिचा तो चेहरा माझ्या लक्षात राहिला. मी तिला थँक्यू म्हटलं. तू दिसायला गोड आहेस, असं म्हणाले आणि मी गेले.
दुसऱ्या दिवशी माझं शूटिंग जिथे होतं, तिथे मला मेकअप रूम शेअर करावी लागणार आहे, तिथे काहीतरी अडचण आहे वगैरे असं सांगितलं गेलं. मी ओके म्हणाले. मी तिथल्या मेकअपरूममध्ये गेले, तर तिथे तीच मुलगी होती. मी तिला विचारलं की तू अभिनेत्री आहेस का? तर ती म्हणाली हो, माझं शूटिंग आहे. मी तिला विचारलं की तुझं नाव काय आहे? तू किती छान दिसतेस. यावर ती मुलगी म्हणाली, विद्या बालन नाव आहे.”
पुढे सोनाली कुलकर्णी म्हणाली, “विद्याला हे लक्षात आहे. आम्ही अलीकडेच आशुतोष गोवारीकर यांच्या मुलाच्या लग्नात भेटलो होतो, त्यावेळी आम्ही गप्पा मारत होतो. विद्या मला म्हणाली की तुला आठवतं का? मी एकदा तुला विमानात कॉम्प्लिमेंट दिलं होतं. मी तिला म्हटलं की मी म्हणायला पाहिजे की तू माझं कौतुक केलं होतंस हे माझ्या लक्षात आहे. विद्या खूप गोड आहे. तिलासुद्धा खूप जाहिराती मिळायच्या”, असे वक्तव्य करत सोनाली कुलकर्णीने विद्या बालनचे कौतुक केले आहे.