प्रसाद ओक दिग्दर्शित ‘सुशीला सुजीत’ हा चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. प्रसाद ओकने या चित्रपटाच्या दिग्दर्शन व निर्मितीची धुरा सांभाळली आहे. प्रसादबरोबर मंजिरी ओक व स्वप्नील जोशीदेखील या चित्रपटाचे निर्माते आहेत. १८ एप्रिलला हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या चित्रपटात सोनाली कुलकर्णी(Sonali Kulkarni) व स्वप्नील जोशी(Swapnil Joshi) प्रमुख भूमिकांत दिसणार आहेत. आता नुकत्याच एका मुलाखतीत स्वप्नील जोशीबरोबर काम करण्याचा अनुभव सांगितला आहे.
मी खूप गॉसिप…
सोनाली कुलकर्णी व स्वप्नील जोशी यांनी सुशीला सुजीत या चित्रपटाच्या निमित्ताने सकाळ प्रिमिअरशी संवाद साधला. यावेळी स्वप्नील जोशीबरोबर काम करण्याचा अनुभव कसा होता, याबाबत सोनाली कुलकर्णीने वक्तव्य केले. अभिनेत्री सोनाली कुलकर्णी म्हणाली, “मी याआधी त्याला स्क्रीनवर पाहिलेलं आहे. पुरस्कार सोहळ्यात त्याच्यामागे माणसं मागे-पुढे पळत असतात. त्यामुळे का कोण जाणे, पण मला असं वाटलेलं की, तो फक्त मेकअप आणि कपड्यांबद्दलच बोलेल; पण तो फारच कूल आहे. पहिल्या दिवशीच धक्का बसला की, त्याला वाक्य वगैरे येत होती. त्याला माहीत होतं की, याआधीचा सीन काय आहे आणि नंतरचा सीन काय आहे. तो व्यवस्थित तयारी करून येणारा नट आहे. याचं मला खूप कौतुक वाटलं.
पुढे सोनाली कुलकर्णी गमतीने म्हणाली, “त्यानं माझा खूप अपेक्षाभंग केला. मला असं वाटलेलं की, मी खूप गॉसिप करेन की काय आहे हे, तो फक्त आरशातच बघत बसतो. त्याला त्याचं फक्त शूज आणि सॉक्स या गोष्टींबद्दलच पडलेलं असतं. असं काहीच बोलण्याची संधी त्यानं दिली नाही. तो मूर्तिमंत ग्लॅमरस आहेच. पण, त्याच्यासाठी तो फक्त ग्लॅमरस राहत नाही. तो खूप नम्र अभिनेता आहे”, असे म्हणत अभिनेत्रीने स्वप्नील जोशीचे कौतुक केले आहे.”
सुशीला सुजीत या चित्रपटाची मोठी चर्चा सुरू असल्याचे पाहायला मिळत आहे. या चित्रपटातील चिऊताई चिऊताई दार उघड हे गाणे काही दिवसांपूर्वीच प्रेक्षकांच्या भेटीला आले होते. या गाण्याने सर्वांचे लक्ष वेधून घेतले होते. या गाण्यात अमृता खानविलकर आणि गश्मीर महाजनी दिसले होते. या जोडीची मोठी चर्चा रंगताना दिसली होती. सुशीला सुजीत या चित्रपटात सोनाली कुलकर्णी व स्वप्नील जोशीबरोबरच रेणुका दफ्तरदार, सुनील तावडे, सुनील गोडबोले हे कलाकारही महत्त्वाच्या भूमिकांत दिसणार आहेत. आता या चित्रपटाची नेमकी गोष्ट काय हे पाहण्यासाठी प्रेक्षक उत्सुक आहेत.