सोनू निगमने आपल्या गाण्याने श्रोत्यांच्या मनावर अधिराज्य गाजवले आहे. सोनू निगमच्या मधुर आवाजाने श्रोते मंत्रमुग्ध होतात. रोमँटिक गाणे असो की भावनिक गाणे सोनू निगम त्याच्या जादुई आवाजाने ते गाणे सुंदर बनवतो. बॉलीवूड सिनेमांसह सोनूने अनेक भाषांत गाणी गायली आहेत. सोनू निगमने मराठीतही अनेक गाणी गायली आहेत. सचिन पिळगावकर यांच्या’ नवरा माझा नवसाचा’ या सिनेमात त्याने गायलेले ‘हिरवा निसर्ग’ हे गाणे आजही प्रेक्षकांच्या लक्षात आहे. आता सोनूचे नवे मराठी गाणे प्रेक्षकांच्या भेटीस आले आहे.
सोनू निगमने नववर्षाची सुरुवात मराठी गाण्याने केली आहे. शंकर एहसान लॉय यांनी संगीतबद्ध केलेले, आगामी मराठी चित्रपट ‘संगीत मानापमान’ सिनेमातले ‘चंद्रिका’ हे गाणे सोनू निगमने आपल्या सुमधुर आवाजाने गायले आहे. हे गाणे प्रेक्षकांच्या भेटीला आले आहे.
गायक सोनू निगमने पहिल्यांदाच अशा प्रकारचे गाणे एका मराठी सिनेमासाठी गायले आहे असे त्याने सांगितले. ‘चंद्रिका’ या गाण्याविषयी बोलताना सोनू निगम म्हणाला, ‘असं गाणं मी कदाचित आतापर्यंत कोणत्याही चित्रपटासाठी गायलं नसेल, हे गाणं खूपच वेगळं आहे, हे गाणं जेव्हा मी पहिल्यांदा ऐकलं तेव्हा माझ्या मनात एका मंदिरात असतं तसं वातावरण तयार झालं, परंतु हे एक डिव्होशन सोंग (भक्ती गीत) नसून प्रेमाचं गीत आहे. प्रेमा मध्ये सुद्धा भक्ती आहे, मी ह्या गाण्यासाठी स्वतःला पूर्णपणे समर्पण केलं आहे. देवाचे आभार आहेत की मला अशा प्रकारचं गाणं गाण्याची संधी मिळाली.”
हे गाणे ऐकायला जितके छान आहे तितकेच या गाण्याचे सुरेख चित्रीकरण झाले आहे. सुबोध भावे आणि वैदेही परशुरामीवर हे गाणे चित्रित करण्यात आले असून ‘चंद्रिका दव रूपाने या धरतीवर अवतरली’ असे या गाण्याचे बोल आहेत. सुबोध भावे आणि वैदेही परशुरामी यांचा वनामध्ये (जंगलात) निसर्गाच्या सानिध्यात झालेला रोमान्स याचे सुंदर चित्रीकरण यात करण्यात आले आहे. सोनू निगमच्या सुरेख आवाजाबरोबर शंकर एहसान लॉय यांचे संगीत आणि त्याच्या जोडीला समीर सामंत यांच्या गीताने हे सुंदर गाणे तयार झाले आहे.
हेही वाचा…अलका कुबल यांनी सांगितली पायलट लेकीबरोबरच्या ‘या’ फोटोमागची गोष्ट, म्हणाल्या, “जेव्हा विमान थांबलं…”
सोनू निगमने मराठी संगीत आणि मराठी गायक या विषयी सुद्धा आपले मत मांडत त्याचा आवडता मराठी गायक कोण ह्याची माहिती दिली. तो म्हणाला, “जो कोणी संगीतकार किंवा गायक सुराला शोधून काढतो फक्त तोच एक लेजेंड बनू शकतो. मराठी संगीत तर आहेच पण त्याबरोबर मराठी लेखन हे ही एक वेगळं विश्व आहे. मराठी गायकांबद्दल सांगितलं तर बेला शेंडे, स्वप्नील बांदोडकर हे सगळे उत्तम गायक आहेत. पण तरुणांमध्ये मला आर्या आंबेकरचा आवाज खूप आवडतो, तिने चंद्रमुखी मध्ये खूप सुरेख गायलं आहे. इतर सुद्धा अनेक मराठी गायक आहेत ज्यांचा आवाज मला खूप आवडतो.” या वेळी बोलताना सोनू निगमने ‘संगीत मानापमान’ या चित्रपटाचे दिग्दर्शक आणि अभिनेता सुबोध भावे यांची स्तुती केली आणि त्यांच्या कामाचे कौतुक केले.
जिओ स्टुडिओज प्रस्तुत ‘संगीत मानापमान’ या चित्रपटात सुबोध भावे आणि वैदेही परशुरामी यांच्यासह सुमित राघवन, उपेंद्र लिमये, नीना कुलकर्णी, निवेदिता सराफ, शैलेश दातार, अर्चना निपाणकर आदी कलाकार प्रमुख भूमिकेत आहेत. ‘संगीत मानापमान’ हा सांगीतिक चित्रपट १० जानेवारी २०२५ पासून आपल्या जवळच्या चित्रपटगृहात प्रेक्षकांचे मनोरंजन करण्यास सज्ज आहे.