Mage Ubha Mangesh Pudhe Ubha Mangesh Song: माणसाच्या आयुष्यात गाण्याचे एक वेगळे स्थान असलेले आपल्याला वेळोवेळी जाणवते. मग ती गाणी कोणत्याही भाषेतील असली तरीही गाण्यांचे महत्त्व कायम असते. काही गाणी माणसाच्या मनात घर करतात. अनेक गाणी कशी तयार झाली असतील, असे प्रश्नही निर्माण होतात. आता ‘कहाणी बिहाइंड द गाणी’ या पॉडकास्टमध्ये ‘मागे उभा मंगेश, पुढे उभा मंगेश’ हे गाणे कसे तयार झाले, त्यामागे काय गोष्ट होती, हे सांगितले आहे.
‘मागे उभा मंगेश, पुढे उभा मंगेश’ गाण्यामागचा काय आहे किस्सा?
अभिनेता अभिषेक देशमुख आणि अभिनेत्री कृतिका देव यांनी स्मृतिगंध निर्मित ‘कहाणी बिहाइंड द गाणी’ या एपिसोडमध्ये ‘मागे उभा मंगेश, पुढे उभा मंगेश’ हे गाणे कसे तयार झाले याची आठवण सांगितली आहे. हा किस्सा सांगताना कृतिका म्हणते, “एकदा लता मंगेशकर शांताबाईंना म्हणाल्या, आम्ही सगळे देवदर्शनासाठी मंगेशीला जातोय, तर आमच्याबरोबर तुम्ही पण या. शांताबाई त्यांच्याबरोबर गेल्या, देवदर्शन झाल्यानंतर जेव्हा सगळे गप्पा मारत पायऱ्यांवर बसले होते, त्यावेळी आशाताई शांताबाईंना म्हणाल्या, हा मंगेश माझ्या पाठीमागे सदैव उभा आहे ना, म्हणून मी सगळ्या संकटांचा सामना करू शकते आणि म्हणूनच यश मिळत आहे. हे ऐकल्या क्षणीच शांताबाईंना तिथेच शब्द सुचले आणि गाणं जन्माला आलं, ‘मागे उभा मंगेश, पुढे उभा मंगेश, माझ्याकडे देव माझा पाहतो आहे’, अशाप्रकारे हे गाणे तयार झाल्याचे कृतिकाने सांगितले.
‘महानंदा’ चित्रपटातील ‘मागे उभा मंगेश, पुढे उभा मंगेश’ हे गाणे आशा भोसलेंनी गायले असून गीतरचना शांता शेळके यांची आहे; तर या गाण्याला पंडित हृदयनाथ मंगेशकर यांनी संगीत दिले आहे. हे गाणे आजही लोकप्रिय असल्याचे पाहायला मिळते.
दरम्यान, शांता शेळके यांची अनेक गाणी प्रसिद्ध आहेत. १२ ऑक्टोबर १९२२ साली जन्मलेल्या शांता शेळके लोकप्रिय मराठी कवियित्री होत्या. याबरोबरच प्राध्यापिका, लेखिका, पत्रकार म्हणूनदेखील त्यांची ओळख होती. ‘असेन मी नसेन मी’, ‘आई बघना कसा हा’, ‘असता समीप दोघे हे’, ‘आज मी आळविते केदार’, ‘ऋतु हिरवा, ऋतु बरवा’, ‘जीवनगाणे गातच रहावे’, ‘वादलवारं सुटलं गो’, ‘पप्पा सांगा कुणाचे’, शांता शेळकेंची अशी अनेक गाणी लोकप्रिय असल्याचे पाहायला मिळते.