प्रसिद्ध लेखक-दिग्दर्शक दिग्पाल लांजेकर यांच्या ‘श्री शिवराज अष्टक’ची चांगलीच चर्चा पाहायला मिळत आहे. ‘फर्जंद’, ‘फत्तेशिकस्त’, ‘पावनखिंड’, ‘शेर शिवराज’ या चार ऐतिहासिक चित्रपटानंतर आता लवकरच ‘श्री शिवराज अष्टका’तील पाचवा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. ‘सुभेदार’ असे या चित्रपटाचे नाव असून हा चित्रपट नरवीर तानाजी मालुसरे यांच्या कामगिरीवर आधारित असणार आहे. आता या चित्रपटाच्या प्रदर्शनाची तारीख बदललण्यात आली आहे.

प्रसिद्ध अभिनेता चिन्मय मांडलेकरने नुकतंच इन्स्टाग्रामवर एक पोस्ट शेअर केली आहे. त्या पोस्टद्वारे त्याने चाहत्यांना ही गुडन्यूज दिली आहे. ‘सुभेदार’ या चित्रपटातील पहिलं गाणं नुकतंच प्रदर्शित करण्यात आलं. यावेळीच त्यांनी ही आनंदाची बातमी जाहीर केली.
आणखी वाचा : ‘सुभेदार’ चित्रपटात तानाजी मालुसरे यांची भूमिका कोण साकारणार? नाव आलं समोर

“सह्याद्रीला आज येतीया जाग, दख्खनचा गर्व ह्ये शिवाजी राजं.. सादर आहे ‘सुभेदार’ मधील पहिलंवहिलं, आपल्या सर्वांचं गाणं ‘मावळं जागं झालं रं..’! १८ ऑगस्टला गाजणार सिंहगडाचा पोवाडा..”, असे कॅप्शन या व्हिडीओला देण्यात आलं आहे.

आणखी वाचा : ‘सुभेदार’ चित्रपटातील तानाजी मालुसरेंच्या कुटुंबाची झलक समोर; शिवानी रांगोळे, समीर धर्माधिकारी दिसणार ‘या’ खास भूमिकेत

तसेच या व्हिडीओच्या शेवटी या चित्रपटाच्या प्रदर्शनाची तारीखही सांगण्यात आली आहे. येत्या १८ ऑगस्टला ‘सुभेदार’ हा चित्रपटात संपूर्ण राज्यात प्रदर्शित होणार आहे. यापूर्वी हा चित्रपट २५ ऑगस्ट रोजी प्रदर्शित होणार होता. मात्र आता त्याच्या प्रदर्शनाची तारीख बदलण्यात आली आहे.

दरम्यान काही दिवसांपूर्वी या चित्रपटाचा टीझर आणि पोस्टर समोर आले होते. यात पोस्टरमध्ये तानाजी मालुसरेंच्या कुटुंबाची झलक पाहायला मिळाली होती. यात अभिनेते अजय पुरकर हे तानाजी मालुसरे हे पात्र साकारताना दिसत आहेत. तर त्यांच्या पत्नीची सावित्रीबाईंची भूमिका अभिनेत्री स्मिता शेवाळे यांनी साकारली आहे. सूर्याजी मालुसरेंच्या दमदार भूमिकेत अभिजीत श्वेतचंद्र, त्यांच्या पत्नीची म्हणजे यशोदाबाईंची भूमिका अभिनेत्री शिवानी रांगोळे साकारत आहे. तर सुभेदारांचा मुलगा रायबाच्या भूमिकेत अर्णव पेंढारकर दिसत आहे.

Story img Loader