Subhedar Movie : मराठी मनोरंजनसृष्टीत गेल्या दिवसांपासून ‘सुभेदार’ चित्रपटाची जोरदार चर्चा सुरु आहे. श्री शिवराज अष्टक मालिकेतील हा पाचवा चित्रपट आज प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे. या ऐतिहासिक चित्रपटाचे कथानक ‘सुभेदार तानाजी मालुसरे’ यांच्या जीवनावर आणि कोंढाण्याच्या लढाईवर आधारित आहे. शिवराज अष्टक मालिकेतील ‘फर्जंद’, ‘पावनखिंड’, ‘शेर शिवराज’, ‘फत्तेशिकस्त’ या चित्रपटांना प्रेक्षकांकडून भरभरून प्रतिसाद मिळाला होता. त्यामुळे ‘सुभेदार’ चित्रपटाची प्रेक्षकवर्ग आतुरतेनं वाट पाहत होता. या चित्रपटाच्या निमित्ताने मालिकेतील प्रमुख कलाकारांनी ‘लोकसत्ता डिजिटल अड्डा’ला हजेरी लावली होती. यावेळी त्यांनी चित्रपटासंदर्भात अनेक खुलासे केले.
हेही वाचा : “चित्रपटगृहांकडे भीक मागावी लागते”, मराठमोळ्या अभिनेत्याने व्यक्त केली खंत; म्हणाला, “महाराष्ट्रात राहून…”
श्री शिवराज अष्टक मालिकेच्या चित्रपटांसह यामधील गाण्यांनाही प्रेक्षकांकडून चांगला प्रतिसाद मिळाला. यामधील गाण्यांविषयी सांगताना अभिनेत्री मृणाल कुलकर्णी म्हणाल्या, “‘सुभेदार’ हा श्री शिवराज अष्टक मालिकेचा पाचवा चित्रपट आहे. आमच्या पाच चित्रपटांनी मिळून म्हणजेच संपूर्ण शिवराज अष्टक मालिकेने प्रेक्षकांना एकूण ३५ गाणी दिली आहेत आणि ही सगळी गाणी अतिशय सुंदर आहेत.”
“महाराष्ट्राच्या तमाम रसिक प्रेक्षकांना मी हात जोडून विनंती करते की, आता शिवजन्म, शिवजयंतीला कृपा करुन आमच्या पाच चित्रपटांमधील ३५ गाणी पुन्हा-पुन्हा वाजवा पण, भयावह गाणी लावू नका. याआधी विचित्र गाणी का लावता असं विचारलं की, आमच्याकडे गाणी नाहीत अशी कारणं दिली जायची. आता या मालिकेमुळे ते कारण तरी संपलंय त्यामुळे ही ३५ गाणी वाजवा.” असं मृणाल कुलकर्णी यांनी महाराष्ट्राच्या जनतेला सांगितलं.
हेही वाचा : प्रसिद्ध मालिकेतील कलाकारांनी खाल्ली सुप्रिया पाठारेंच्या लेकानं बनवलेली पावभाजी, चवीबद्दल म्हणाले…
चिन्मय मांडलेकर याबाबत म्हणाला, “काही दिवसांपूर्वी मी युट्यूबवर शिवराज अष्टक मालिका अशी प्लेलिस्ट बनवून ठेवली आहे. अष्टकातील सगळी गाणी त्या एका प्लेलिस्टमध्ये प्रेक्षकांना सापडतील.” दरम्यान, दिग्पाल लांजेकर दिग्दर्शित ‘सुभेदार’ चित्रपटात मृणाल कुलकर्णी, चिन्मय मांडलेकर, अजय पूरकर, स्मिता शेवाळे, विराजस कुलकर्णी, शिवानी रांगोळे, अभिजीत श्वेतचंद्र, समीर धर्माधिकारी या कलाकारांनी महत्त्वाच्या भूमिका साकारल्या आहेत.