दिग्पाल लांजेकर दिग्दर्शित ‘सुभेदार’ हा चित्रपट सध्या बॉक्स ऑफिसवर जोरदार कमाई करत आहे. ‘श्री शिवराज अष्टका’मधील हे पाचवं चित्र पुष्प असून यामध्ये सुभेदार तानाजी मालुसरे यांच्या पराक्रमाची गाथा दाखवण्यात आली आहे. या चित्रपटातील प्रत्येक कलाकाराने जबरदस्त काम केलं आहे. विशेष म्हणजे तानाजी मालुसरे यांची भूमिका साकारणारे अभिनेते अजय पुरकर यांनी आपल्या अभिनयाने प्रेक्षकांची मनं जिंकली आहे. एकाबाजूला ते त्यांच्या कामामुळे चर्चेत आहेत. पण दुसऱ्याबाजूला ते त्यांच्या वक्तव्यांमुळेही तितकेच चर्चेत आहेत. नुकतंच त्यांनी मराठी भाषेच्या अभिमानाबाबत वक्तव्य केलं आहे; जे चांगलंच चर्चेत आलं आहे.
‘सुभेदार’ या चित्रपटाच्यानिमित्तानं ‘मिरची मराठी’ या रेडिओ चॅनेलला दिलेल्या मुलाखती दरम्यान अजय पुरकर यांनी मराठी भाषेच्या अभिमानाबाबत हे वक्तव्य केलं आहे. ते म्हणाले की, “आपल्या भाषेचा अभिमान आहे? तर हो. मी आजही विमानतळावर गेलो तरी मराठीत बोलतो. कारण याचं मी एक नेहमी विनोदी उदाहरण देतो, ते पण खरं आहे. एखादी फ्रेंच बाई आल्यानंतर ती फ्रेंचमध्येच बोलते की नाही? मग समोरच्याचा चेहरा बघण्यासारखा होतो की नाही? त्यामुळे तुम्ही पण त्यांचे चेहरे बघण्यासारखे करा. बोलायचं, विमानातला माझा आसान क्रमांक काय आहे? समोरचा, येस सर? मग तुम्ही, मी मराठीत बोलतोय. तुम्हाला मराठी कळतं? तुला कळतं नाही ते तू मला सांग. मग मी तुझ्या भाषेत बोलतो. पण मी माझ्याच भाषेत बोलणार. इतर लोक त्यांची भाषा बोलायचं सोडतात का? नाही सोडतं. मग आपण का मराठी भाषा बोलणं सोडायचं?”
हेही वाचा – Video: अभिजीत बिचुकलेंची ‘खुपते तिथे गुप्ते’च्या मंचावर हजेरी; इंग्रजी ऐकून अवधूत गुप्ते झाला थक्क
पुढे अजय पुरकर म्हणाले की, “रेस्टॉरंटला जाऊन का इंग्रजी भाषेत बोलतो? मला माझ्या भाषेत बोलता येतं. तुमच्याकडे अमुक-अमुक मिळेल का? हे विचारता येतं. त्या समोरच्याला सांगू दे मला मराठी येत नाही, मग मी बोलेन. हा जो अभिमान आहे, तो आपण टिकवला पाहिजे. मी प्रत्येक विमानतळावर मराठीत जाऊन बोलतो. मला तीच भाषा येते तर? या गोष्टी आपण एक महाराष्ट्रीय म्हणून त्याचा विस्तार केला पाहिजे. ज्या गोष्टीचा अभिमान आहे, त्या गोष्टीचा अभिमान पाहिजेच. थोडसं जर आपण बाहेर गेलो, तर तुम्ही ती संधी साधा.”
हेही वाचा – “…यामुळे पहिल्याच टेकमध्ये दहीहंडी फोडू शकले”; ‘ठरलं तर मग’ फेम जुई गडकरीने सांगितला किस्सा
दरम्यान, अजय पुरकर यांच्या कामाबद्दल बोलायचं झालं तर, ‘सुभेदार’ पूर्वी त्यांनी ‘फर्जंद’, ‘फत्तेशिकस्त’, ‘पावनखिंड’, ‘शेर शिवराज’ या चार ऐतिहासिक चित्रपटामध्ये महत्त्वाची भूमिका बजावली होती. चित्रपटांव्यतिरिक्त ते बऱ्याच मालिकांमध्ये झळकले आहेत.