‘श्री शिवराज अष्टका’मधील पाचवं पुष्प म्हणजेच ‘सुभेदार’ चित्रपट आजपासून प्रेक्षकांच्या भेटीस आला आहे. ‘फर्जंद’, ‘फत्तेशिकस्त’, ‘पावनखिंड’, ‘शेर शिवराज’ या चार ऐतिहासिक चित्रपटानंतर ‘सुभेदार’ या चित्रपटाला प्रेक्षकांचा चांगलाच प्रतिसाद मिळत आहे. तानाजी मालुसरे यांची शौर्यगाथा या चित्रपटातून पाहायला मिळत आहे. पण चित्रपट प्रदर्शित होऊन एक दिवस पूर्ण न होताच प्रेक्षकांच्या एका कृतीमुळे दिग्दर्शक दिग्पाल लांजेकर यांनी नाराजी व्यक्त केली आहे. यासंबंधित दिग्पाल यांनी सोशल मीडियावर एक व्हिडीओ शेअर करून प्रेक्षकांना विनंती केली आहे.
हेही वाचा – Jaane Jaan: करीना कपूरचं ओटीटीवर दमदार पदार्पण; थ्रिलर चित्रपटात साकारणार ‘ही’ भूमिका, टीझर आला समोर
“सुभेदारला साथ द्या” असं लिहीत दिग्पाल लांजेकरांनी सोशल मीडियावर एक व्हिडीओ शेअर केला आहे. या व्हिडीओत दिग्पाल यांनी प्रेक्षकांची ती कृती सांगून त्यांना विनंती केली आहे. दिग्पाल म्हणाले, “सगळ्यांना जय शिवराय. आम्हाला सगळ्यांना खूप आनंद होतोय की, ‘सुभेदार’ हे पाचवं चित्र पुष्प लोकांना खूप आवडत आहे. शिवाय मला याचा देखील आनंद होतोय की, आमचे प्रयत्न सफळ होताना दिसत आहेत. परंतु आताच चित्रपट प्रदर्शित झालाय आणि लगेच लक्षात येतंय की, यातला क्लायमॅक्सचा जो भाग आहे. तो बरेच जण शूट करून इन्स्टावर शेअर करत आहेत. मी तुमच्या भावना समजू शकतो की, तुम्हाला हे सगळं एकमेकांबरोबर शेअर करायचं आहे. जी कलाकृती निर्माण झाली आहे, ती सगळ्यांबरोबर वाटून घ्यायची आहे. पण असं करू नका, कारण त्यामुळे इतरांचा रसभंग होतो.”
हेही वाचा – व्याख्यानं फुकट देण्याच्या मागणीवर अभिनेते शरद पोंक्षे म्हणाले, “मी मेलो तरी…”
पुढे दिग्पाल म्हणाले की, “ज्यांना चित्रपटगृहात जाऊन चित्रपट पाहायचा आहे, त्यांना मग त्यात तितकासा रस आणि मज्जा राहणार नाही. तुम्ही जो भक्तीचा, निष्ठेचा अनुभव घेतलात, तो अनुभव त्यांना घेता येणार नाही. त्यामुळे मी तुम्हा सगळ्यांना विनंती करतो की, कृपया क्लायमॅक्सचा भाग किंवा चित्रपटाचा इतर भाग हा शूट करून अपलोड करू नका. इतरांचा आणि शिवभक्तांचा रसभंग करू नका. त्यांनाही तो अनुभव घेऊ द्या, ती भक्ती अनभवू द्या. जय शिवराय. तुम्ही सगळे मला साथ द्याल. याबद्दल आशा बाळगतो. माझी जी अपेक्षा आहे, ती पूर्ण कराल. याची खात्री बाळगतो, जय शिवराय.” दिग्पाल यांच्या या विनंतीनंतर अभिनेता चिन्मय मांडेलकर यानं देखील प्रेक्षकांना हीच विनंती केली.
हेही वाचा – ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ फेम शिवाली परबला चाहत्यांकडून पाहिजेत ‘हे’ गिफ्ट्स; म्हणाली, “मुंबईत एक घर अन्…”
दरम्यान, दिग्पाल यांच्या ‘सुभेदार’ चित्रपटात मुख्य भूमिका म्हणजेच तानाजी मालुसरेंची भूमिका अभिनेता अजय पुरकर यांनी साकारली आहे. तसेच छत्रपती शिवाजी महाराज यांच्या भूमिकेत पुन्हा चिन्मय मांडलेकर दिसत आहे; तर जिजाऊ आईसाहेबांच्या भूमिकेत मृणाल कुलकर्णी पाहायला मिळत आहेत.