दिग्पाल लांजेकर दिग्दर्शित ‘सुभेदार’ चित्रपटाची सध्या चांगलीच चर्चा सुरु आहे. शिवराज अष्टक मालिकेतील ‘सुभेदार’ हा चित्रपट येत्या २५ ऑगस्टला प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. मालिकेतील या पाचव्या ऐतिहासिक चित्रपटात सुभेदार तानाजी मालुसरे यांचा इतिहास दाखवण्यात आला आहे. श्री शिवराज अष्टक मालिकेतील ‘फर्जंद’, ‘फत्तेशिकस्त’, ‘पावनखिंड’, ‘शेर शिवराज’ या चित्रपटांना प्रेक्षकांनी भरभरुन प्रतिसाद दिला. छत्रपती शिवाजी महाराजांच्या या चित्रपटांमुळे अनेकांच्या जीवनावर सकारात्मक परिणाम झाल्याचे दिग्दर्शक दिग्पाल लांजेकर यांनी नुकत्याच दिलेल्या मुलाखतीत सांगितले.
श्री शिवराज अष्टक मालिकेमुळे प्रेक्षकांच्या विचारसरणीत झालेल्या बदलांविषयी दिग्पाल लांजेकर यांनी महाराष्ट्र टाइम्सला दिलेल्या मुलाखतीत भाष्य सांगितले. दिग्दर्शक म्हणाले, “छत्रपती शिवाजी महाराजांचे विचार ही आमच्यासाठी खूप मोठी संजीवनी आहे आणि त्यांच्या विचारांचा अनुभव, प्रेरणा आम्ही सातत्याने घेत असतो. प्रेक्षकांच्या विचारसरणीत झालेल्या बदलांविषयीचे एक उदाहरण सांगायचे झाले तर, ठाण्याचा कारागृहात काही बालगुन्हेगार होते. त्या कारागृहाच्या अधिकाऱ्यांनी त्या बालकांच्या विचारसरणीत बदल व्हावा आणि त्यांना प्रेरणा देण्यासाठी त्यातून ८ बालकांची निवड केली. या बालगुन्हेगारांना त्या अधिकाऱ्यांनी सातत्याने शिवराज अष्टक मालिकेचे ‘फर्जंद’, ‘फत्तेशिकस्त’, ‘पावनखिंड’ आणि ‘शेर शिवराज’ असे चारही चित्रपट दाखवले.”
“छत्रपती शिवाजी महाराजांवर आधारित हे चारही चित्रपट पाहिल्यावर ते आठ बालगुन्हेगार ढसाढसा रडले. ‘आमचे काय पूर्वज होते आणि आज आम्ही काय करतोय?’ असे त्या बालगुन्हेगारांनी संबंधित अधिकाऱ्यांकडे कबूल केले. आम्ही किती वाईट आयुष्य जगतोय..आम्हालाही चांगले आयुष्य जगण्याची इच्छा आहे. मानाने आयुष्यात उभे राहायचे आहे. त्या बालगुन्हेगार मुलांपैकी काही जणांनी पदवीधर होण्यासाठी महाविद्यालयात प्रवेश घेतला. काही जणांनी वडापावची किंवा भाजीची गाडी टाकून त्या मुलांनी गुन्हेगारी पूर्णपणे सोडली.” असे दिग्पाल लांजेकर यांनी सांगितले.
दरम्यान, शिवराज अष्टक मालिकेतील पाचवा चित्रपट ‘सुभेदार’मध्ये चिन्मय मांडलेकर, मृणाल कुलकर्णी, विराजस कुलकर्णी, शिवानी रांगोळे, अभिजीत श्वेतचंद्र, स्मिता शेवाळे, समीर धर्माधिकारी या कलाकारांनी महत्त्वाच्या भूमिका साकारल्या आहेत. तसेच चित्रपटात तानाजी मालुसरे यांची मुख्य भूमिका अभिनेते अजय पूरकर साकारणार आहेत. येत्या २५ ऑगस्टला दिग्पाल लांजेकर दिग्दर्शित ‘सुभेदार’ चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येईल.