‘फर्जंद’, ‘फत्तेशिकस्त’, ‘पावनखिंड’ आणि ‘शेर शिवराज’ या चित्रपटानंतर श्री शिवराज अष्टक मालिकेतील ‘सुभेदार’ हा पाचवा चित्रपट २५ ऑगस्टला प्रेक्षकांच्या भेटीला आला. दिग्पाल लांजेकर ‘सुभेदार’ चित्रपटाची सध्या जोरदार चर्चा सुरु आहे. चित्रपटाने पहिल्या तीन दिवसांत बॉक्स ऑफिसवर ५.०६ कोटींचा गल्ला जमावला आहे. हा ऐतिहासिक चित्रपट सुभेदार तानाजी मालुसरे यांच्या जीवनावर आधारित आहे. प्रेक्षकांचा मिळणारा भरघोस प्रतिसाद पाहून निर्मात्यांनी खास ऑफरची घोषणा केली आहे.
‘सुभेदार’ चित्रपटाच्या टीमने सोशल मीडियावर खास पोस्ट शेअर करत विशेष ऑफरची घोषणा केली आहे. पीव्हीआर आणि आयनॉक्स चित्रपटगृहांमध्ये शालेय विद्यार्थ्यांना फक्त १४० रुपयांमध्ये हा चित्रपट पाहता येणार आहे. ही ऑफर फक्त महाराष्ट्रातील शाळकरी विद्यार्थ्यांसाठी लागू असणार आहे.
हेही वाचा : “तू फार लवकर गेलास”, इरफान खान यांच्या आठवणीत मराठी अभिनेता झाला भावुक; म्हणाला, “या जन्मात आपली भेट…”
महाराष्ट्रातील शाळकरी मुलांना या ऑफरमधून चित्रपट पाहायचा असल्यास काही नियम लागू करण्यात आले आहेत. किमान १०० तिकिटांची एकत्रित बुकिंग करणे आवश्यक आहे. तसेच सोमवार ते गुरुवारपर्यंत सकाळी ११ च्या आधीच्या शोसाठी ही ऑफर असेल. कन्फर्मेशन आणि तिकिटांचे पैसे ४८ तास आधी भरणे आवश्यक आहे. पीव्हीआर आणि आयनॉक्समध्ये प्रत्येकी १४० रुपयांमध्ये मुलांसाठी शोचे आयोजन करण्यात येईल. असे या पोस्टमध्ये नमूद करण्यात आले आहे.
दरम्यान, ‘सुभेदार’ प्रदर्शित झाल्यावर प्रेक्षकांनी पहिल्या शोपासून सिनेमागृहांमध्ये गर्दी करण्यास सुरुवात केली आहे. चिन्मय मांडलकेर, अजय पूरकर, मृणाल कुलकर्णी, स्मिता शेवाळे, समीर धर्माधिकारी, अभिजीत श्वेतचंद्र, शिवानी रांगोळे, विराजस कुलकर्णी या कलाकारांनी ‘सुभेदार’मध्ये महत्त्वाच्या भूमिका साकारल्या आहेत.