दिग्पाल लांजेकर दिग्दर्शित ‘सुभेदार’ चित्रपटाची सध्या जोरदार चर्चा सुरु आहे. हा ऐतिहासिक चित्रपट सुभेदार तानाजी मालुसरे यांच्या जीवनावर आधारित आहे. नुकतीच या चित्रपटाच्या संपूर्ण टीमने ‘लोकसत्ता डिजिटल अड्डा’ला हजेरी लावली होती. यावेळी कलाकारांनी शूटिंगदरम्यान आलेले असंख्य अनुभव आणि किस्से सांगितले. श्री शिवराज अष्टक मालिकेतील सगळ्या चित्रपटांमध्ये अभिनेत्री मृणाल कुलकर्णींनी राजमाता जिजाऊंची भूमिका साकारली आहे. ‘सुभेदार’च्या निमित्ताने पहिल्यांदाच त्यांचा मुलगा विराजस कुलकर्णी आणि सून शिवानी रांगोळे एकाच चित्रपटात काम करणार आहेत. चित्रपटाच्या शूटिंगचा अनुभव कसा होता याविषयी विराजसने ‘लोकसत्ता’ला दिलेल्या मुलाखतीत सांगितले आहे.
हेही वाचा : Video : निक जोनसवर भर कार्यक्रमात चाहत्याने फेकली ‘ही’ वस्तू, संतप्त गायकाने हाताने केला इशारा अन्…
अभिनेता विराजस कुलकर्णी ‘सुभेदार’ चित्रपटाच्या शूटिंगचे अनुभव सांगताना म्हणाला, माझा फार पूर्वीपासून या टीमशी संबंध येत होता आणि यामधील बऱ्याच कलाकारांना मी आधीपासून ओळखतो. ‘सुभेदार’मधील एका गाण्याचा आम्ही सराव करत होतो, त्यावेळी आमचा कोरिओग्राफर किरण बोरकरने आम्हाला संपूर्ण सीन समजावून सांगितला आणि शेवटी तिथे महाराजांचा शॉट येईल असं सांगून ठेवलं होतं. एकंदर मला तांत्रिकरित्या कोणता शॉट केव्हा येणार? याची संपूर्ण कल्पना होती.
हेही वाचा : “ज्या लोकांची लायकी नाही…”, नवऱ्याची बाजू घेत क्रांती रेडकरने मांडलं स्पष्ट मत; म्हणाली, “मला खरंच वाईट…”
“एवढे दिवस गाण्याचा सराव केल्यानंतर जेव्हा प्रत्यक्ष शूटिंगचा दिवस आला तेव्हा महाराजांचा जिरेटोप पाहून आणि चिन्मय दादाला महाराजांच्या भूमिकेत पाहून माझ्या अंगावर काटा आला होता. माझ्यासमोर खरंच महाराज उभे आहेत असं वाटत होतं…चिन्मय दादा आहे हे मी खरंच विसरुन गेलो होतो. आता हा प्रसंग सांगतानाही माझ्या अंगावर काटा येतोय…त्यामुळे मी म्हणेन बरं झालं चित्रपटात आईबरोबर माझा एकही सीन नव्हता कारण, आई आणि जिजाबाई हे दोन्ही एकत्र पाहून मला नाही माहिती माझं काय झालं असतं.” असं विराजसने सांगितलं.
हेही वाचा : “नाच ग घुमा”, ‘इंडियाज बेस्ट डान्सर’च्या मंचावर ‘बाईपण भारी देवा’ची टीम खेळली मंगळागौर, व्हिडीओ व्हायरल
दरम्यान, ‘सुभेदार’ चित्रपटाच्या निमित्ताने पहिल्यांदाच कुलकर्णी कुटुंब एकत्र चित्रपटात दिसणार आहे. परंतु, या चित्रपटात मृणाल कुलकर्णी, विराजस आणि शिवानी यांनी वेगवेगळ्या भूमिका साकारल्या असून त्यांचा एकमेकांसह एकत्र एकही सीन नाही. विराजस कुलकर्णी ‘जीवा’ या गुप्तहेराची भूमिका साकारत असून शिवानी रांगोळे सूर्याजी मालुसरे यांच्या पत्नीच्या भूमिकेत दिसणार आहे. बहुचर्चित ‘सुभेदार’ येत्या २५ ऑगस्टला प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.