प्रसिद्ध लेखक-दिग्दर्शक दिग्पाल लांजेकर यांच्या ‘श्री शिवराज अष्टक’ची चांगलीच चर्चा पाहायला मिळत आहे. ‘फर्जंद’, ‘फत्तेशिकस्त’, ‘पावनखिंड’, ‘शेर शिवराज’ या चार ऐतिहासिक चित्रपटानंतर आता लवकरच ‘श्री शिवराज अष्टका’तील पाचवा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. ‘सुभेदार’ असे या चित्रपटाचे नाव असून हा चित्रपट नरवीर तानाजी मालुसरे यांच्या कामगिरीवर आधारित असणार आहे. हा चित्रपट येत्या १८ ऑगस्टला प्रदर्शित होत आहे. या चित्रपटाच्या निमित्ताने एक नवीन पोस्टर समोर आलं आहे.
सुभेदार तान्हाजी मालुसरे रायबाच्या लग्नाचं आमंत्रण घेऊन रायगडावर गेले होते. तिथे चिंतेत असणाऱ्या जिजाऊ आऊसाहेब आणि छत्रपती शिवाजी महाराजांना त्यांनी पाहिलं. स्वराज्यावर आलेला प्रसंग ओळखून ते स्वत: कोंढाण्याच्या मोहिमेवर जायला सज्ज झाले. बेलभंडारा उचलून, हात उंचावून ‘आधी लगीन कोंढाण्याचं, मग माझ्या रायबाचं’ अशी शपथ त्यांनी घेतली. स्वामीनिष्ठेचं अजोड उदाहरण असलेला हा प्रसंग प्रत्येक शिवभक्ताच्या हृदयावर कायमचा कोरला गेलेला आहे.
आणखी वाचा : ‘बाईपण भारी देवा’ हिट, मग ‘महाराष्ट्र शाहीर’ का झाला फ्लॉप? केदार शिंदेंनीच सांगितलं कारण, म्हणाले “आज ना उद्या कुणीतरी…”
तो प्रसंग हुबेहुब डोळ्यांसमोर उभं करणारं ज्येष्ठ चित्रकार दीनानाथ दलाल यांच्या कुंचल्यातून अवतरलेलं चित्र आपण बालपणी इतिहासाच्या पाठ्यपुस्तकात पाहिलं आहे. शिवकालीन इतिहास सांगणाऱ्या अनेक पुस्तकांमध्ये याचा समावेश करण्यात आला आहे. त्या गाजलेल्या चित्रावरून प्रेरित होऊन नवीन पिढीसाठी हा प्रसंग ‘सुभेदार’ या महत्त्वाकांक्षी आगामी चित्रपटात चलचित्ररूपात पहायला मिळणार आहे.
आणखी वाचा : ‘सुभेदार’ चित्रपटाच्या प्रदर्शनाची तारीख बदलली, २५ ऑगस्टऐवजी ‘या’ दिवशी प्रदर्शित होणार चित्रपट
लेखक-दिग्दर्शक दिग्पाल लांजेकर यांचा सुभेदार हा चित्रपट लवकरच प्रदर्शित होणार आहे. या चित्रपटात अजय पूरकर सुभेदार तान्हाजी मालुसरेंची व्यक्तिरेखा साकारत आहेत. तर त्यांच्या जोडीला चिन्मय मांडलेकर, मृणाल कुलकर्णी, स्मिता शेवाळे, अभिजीत श्वेतचंद्र, शिवानी रांगोळे, समीर धर्माधिकारी, उमा सरदेशमुख, अर्णव पेंढारकर इत्यादी कलाकारांच्या महत्त्वपूर्ण भूमिकेत दिसणार आहेत.
येत्या १८ ऑगस्टला ‘सुभेदार’ हा चित्रपटात संपूर्ण राज्यात प्रदर्शित होणार आहे. यापूर्वी हा चित्रपट २५ ऑगस्ट रोजी प्रदर्शित होणार होता. मात्र आता त्याच्या प्रदर्शनाची तारीख बदलण्यात आली आहे.