मराठी अभिनेता सुबोध भावे त्याच्या चित्रपटांमुळे चर्चेत असतो. तो त्याच्या वैयक्तिक आयुष्याबद्दल अपडेट्स सोशल मीडियावर शेअर करत असतो. सुबोध व त्याची पत्नी मंजिरीची लव्ह स्टोरीही खूपच खास आहे. सुबोध ‘खुपते तिथे गुप्ते’च्या पुढच्या एपिसोडमध्ये दिसणार आहे. यावेळी त्याने त्याच्या व मंजिरीच्या भेटीबद्दल सांगितलं. सुबोधने रक्ताने मंजिरीचं नाव हातावर कोरलं होतं.
कोणी साकारलेली छत्रपती शिवाजी महाराजांची भूमिका आवडली? सुबोध भावे म्हणाला…
अवधूत गुप्तेने ‘तू मंजिरीला रक्ताने पत्र लिहिलं होतंस हे खरं आहे का?’ असा प्रश्न सुबोधला विचारला होता. त्यावर सुबोध म्हणाला, “हो, गणपतीच्या नंतर मी आणि माझा मित्र सिंहगडला गेलो होतो. गडावर नाही, खाली होतो. ही पण तिकडे येईल असं मला माहीत नव्हतं. मी सिगारेट ओढत होतो आणि एक मुलगी माझ्या शेजारी येऊन थांबली. मी तिच्याकडे पाहिलं अन् ती चिडून निघून गेली. पुढचे काही दिवस ती माझ्याशी बोललीच नाही. मग मी तिला खूप विनवण्या करण्याचा प्रयत्न केला चुकलो असं म्हटलं तरी ती काही बोलली नाही. मग फायनली आपले संस्कार आहेत ना, कयामत से कयामत तक.. कर्कटकने हाताचं रक्त काढलं. मी हातावर तिचं नाव ‘एम’ कर्कटकने कोरलं होतं. आता कदाचित दिसत नाही. हे सगळं करून झालंय,” असं म्हणत सुबोध जोरजोरात हसू लागला.
सुबोध-मंजिरीची फिल्मी लव्ह स्टोरी
सुबोध आणि मंजिरीचं नातं अगदी कमी वयातच बहरलं होतं. सुबोध आणि मंजिरी शालेय दिवसांपासून एकाच नाट्य संस्थेत जात होते. मात्र दहावीला असताना सुबोधने पहिल्यांदा मंजिरीला पाहिलं आणि पाहता क्षणी तो तिच्या प्रेमात पडला. १९९१ मधली ही गोष्ट आहे. यानंतर १० वीला असतानाच सुबोधने मंजिरीला प्रपोज केलं. त्यावेळी मंजिरीने हटके अंदाजात सुबोधला उत्तर दिलं होतं. एका मुलाखतीत ती म्हणाली होती, “मी सुबोधला म्हणाले की बालगंधर्वच्या पुलावर ठराविक वेळेला आले तर हो समज..त्यानंतर मी त्यावेळेला पुलावर गेले.. तेव्हापासून आमचं नातं सुरू झालं.” सुबोध व मंजिरीने १० वर्षे डेट केल्यावर २००१ साली लग्न केलं होतं.