सध्या बॉक्स ऑफिसवर ‘सॅम बहादुर’ विरुद्ध ‘अॅनिमल’ अशी जबरदस्त पाहायला मिळत आहे. ‘अॅनिमल’ या चित्रपटाचं कथानक, सादरीकरण अन् त्यावरून निर्माण झालेलं वादंग यामुळे या चित्रपटाची चांगलीच चर्चा आहे. मिश्र प्रतिक्रिया मिळत असल्या तरी ‘अॅनिमल’ने पाच दिवसात बॉक्स ऑफिसवर ४०० कोटींच्या कमाईचा टप्पा पार केला आहे. यामध्ये मात्र विकी कौशलचा ‘सॅम बहादुर’ मात्र चांगलाच मागे पडला आहे, अद्याप या चित्रपटाने ५० कोटींचाही आकडा गाठलेला नाही.
या गदारोळात मात्र मराठी चित्रपट ‘झिम्मा २’ मात्र तग धरून उभा आहे. दोन्ही हिंदी चित्रपटातील क्लॅशचा ‘झिम्मा २’ला अजिबात फटका बसला नसल्याचं दिसत आहे. चित्रपटाला फार स्क्रीन्स जरी दिलेल्या नसल्या तरी आहेत त्या स्क्रीन्समध्ये चित्रपट हाऊसफूल्ल सुरू असल्याचं सांगितलं जात आहे. नुकतंच मराठी अभिनेता सुबोध भावेनेही याबद्दल पोस्ट शेअर केली आहे.
सुबोध भावेने नुकताच ‘झिम्मा २’ पाहिला असून त्याबद्दल इंस्टाग्राम स्टोरीवर एक फोटो शेअर केला आहे. यात सुबोध लिहितो, “आजूबाजूच्या हिंदी सिनेमांच्या गर्दीत आमचा मराठी चित्रपट हाऊसफूल्ल गर्दीत चालू आहे, याचा प्रचंड आनंद आहे. रसिक प्रेक्षकांना धन्यवाद आणि धमाल चित्रपट दिल्याबद्दल ‘झिम्मा २’ संघाचे खूप कौतुक.” हा फोटो शेअर करताना त्याने चित्रपटातील सगळ्या कलाकारांना व दिग्दर्शक हेमंत ढोमेलाही टॅग केलं आहे.
‘झिम्मा २’ २४ नोव्हेंबरला प्रदर्शित झाला प्रदर्शनाच्या पहिल्याच दिवशी या चित्रपटाने ०.९५ कोटीची कमाई केली होती. दुसऱ्या दिवशी या चित्रपटाने १.७७ कोटीचा गल्ला जमवला होता. तिसऱ्या दिवशी ‘झिम्मा २’ने २.०५ कोटींचा व्यवसाय केला. चौथ्या दिवशी चित्रपटाने ०.७५ कोटीची कमाई केली आहे. पाचव्या दिवशी चित्रपटाने ०.५५ कोटींची कमाई केली होती. तर सहाव्या दिवशी ०.६९ कोटीचा गल्ला जमवला होता. सातव्या दिवशी चित्रपटाने ०.६५ कोटींची व्यवसाय केला आहे. आठवडाभरात चित्रपटाने एकूण ७.७१ कोटींची कमाई केली आहे.
‘झिम्मा २’ चित्रपटात सिद्धार्थ चांदेकर, सुहास जोशी, सुचित्रा बांदेकर, क्षिती जोग, निर्मिती सावंत, सायली संजीव, शिवानी सुर्वे, रिंकू राजगुरू यांच्या प्रमुख भूमिका आहेत. २०२१ मध्ये या चित्रपटाचा पहिला भाग ‘झिम्मा’ प्रदर्शित झाला होता. ‘झिम्मा’च्या पहिल्या भागानेही बॉक्स ऑफिसवर जबरदस्त कमाई केली होती.