मराठी अभिनेता सुबोध भावे ‘खुपते तिथे गुप्ते’च्या आगामी एपिसोडमध्ये दिसणार आहे. यामध्ये त्याला अवधूत गुप्तेने अनेक प्रश्न विचारले, त्या प्रश्नांची सुबोधने उत्तरं दिली. यावेळी सुबोधला राहुल गांधींची भूमिका साकारण्याबद्दल विचारण्यात आलं. आतापर्यंत ‘लोकमान्य टिळक’, ‘बालगंधर्व’, ‘काशिनाथ घाणेकर’ अशा अनेक बायोपिक करणाऱ्या सुबोधने राहुल गांधींबद्दल विचारलेल्या प्रश्नाचं काय उत्तर दिलं, ते जाणून घेऊयात.
‘सैराट’ फेम छाया कदम यांच्या आईचं निधन; फोटो शेअर करत म्हणाल्या, “मुंबईतील घरातील तू जपलेल्या…”
“राहुल गांधी यांची भूमिका असलेला सिनेमा करायची इच्छा आहे का?” असा प्रश्न अवधूत गुप्तेने सुबोध भावेला विचारला. त्यावर सुबोधने उत्तर दिलं. “काय प्रकारे मी त्यांची मुलाखत घेऊ शकतो, असा मी विचार करत होतो आणि माझ्या डोक्यात कल्पना आली की अरे आपण इतके बायोपिक केले आहेत. तर, समजा या कल्पनेने आपण मुलाखतीची सुरुवात केली की माझ्याकडे तुमचा (राहुल गांधी) बायोपिक आलाय. माझ्याकडे कुठलाही बायोपिक येतो तेव्हा मी त्या व्यक्तिरेखेचा अभ्यास करतो. तर तसा मला तुमचा अभ्यास करायचा आहे. राहुल गांधी म्हणजे काय आहात? एका व्यक्तिरेखेला आपण तो कसा आहे हे विचारल्यावर त्या अनुषंगाने त्याची उत्तरं येतात.”
पुढे सुबोधने आपल्याला चित्रपटांमध्ये भूमिका निवडण्याचं स्वातंत्र्य असल्याचं वक्तव्य केलं. “मी कुठल्या भूमिका करायच्या आहेत याचं स्वातंत्र्य मला आहे. तुम्ही तो बघायचा की नाही याचं स्वातंत्र्य तुमचं आहे. मी काही तुम्हाला बळजबरी केलेली नाही की मी राहुल गांधींची भूमिका करतोय तर किंवा केली म्हणून तुम्हाला तो सिनेमा बघायला यायलाच पाहिजे.”
दरम्यान, चार वर्षांपूर्वी राहुल गांधी पुण्यात आले होते. त्यावेळी सुबोध भावेने त्यांची मुलाखत घेतली होती. मुलाखतीत सुबोध म्हणाला, “मी अभिनेता आहे आणि आजवर अनेक बायोपिक मी केले आहेत. मला अनेकदा लोक सांगतात की तू राहुल गांधींसारखा दिसतो. त्यामुळे माझा पुढचा बायोपिक मला राहुल गांधींवर करायचा आहे.” यावर “तू माझ्यासारखा दिसण्यापेक्षा मीच तुझ्यासारखा दिसतो असं म्हटलं तर योग्य ठरेल,” असं राहुल गांधी मिश्लीकपणे म्हणाले होते.